*कोल्हापूरजिल्हापरिषदेमार्फत‘गुढीपाडवा -शाळाप्रवेशवाढवा‘कार्यक्रमअंमलबजावणीचेनियोजन*
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची पटनोंदणी नियमित शाळेत होणे आवश्यक असते. यास अनुसरून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील ४ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविणेत येत आहे. गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून नवीन कार्य सुरू करणेसाठी शुभदिन समजला जातो. या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उददेशाने गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत आहे. या उपक्रमांतर्गत ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करणे, दाखलपात्र मुलांची यादी तयार करून ती गाव / शाळेच्या दर्शनी भागात लावणे, शाळेची जाहिरातपत्रके तयार करून पालकांना वितरीत करणे, विविध माध्यमांदवारे शाळांची जाहिरात करणे असे उपक्रम राबविणेच्या सुचना सर्व शाळांना देणेत आलेल्या आहेत. या उपक्रमाची फलश्रुती म्हणून दरवर्षी गुढी पाडव्यादिवशीच जास्तीत जास्त मुलांची पटनोंदणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होत असलेचे दिसून येत आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविणेत येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती (ABL), डिजीटल शाळा, ISO शाळा मानांकन अशा उपक्रमांची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रो केंद्र भेट अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविणेत येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याच अपेक्षा या आवाहनाव्दारे करणेत आलेली आहे.
गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (६ वर्षे पूर्ण असणा-या) बालकाचा प्रवेश कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करून आपल्या पाल्याचे भवितव्य उज्वल करणेची संधी जिल्हा परिषदेच्या शाळांना द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी आवाहन केले आहे.
शिक्षणाधिकारी(प्राथ.)
जिल्हापरिषदकोल्हापूर