केंद्र शासनाच्या वतीने दिनांक 13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.
सर्वेक्षणासाठी केंद्र शासनामार्फत निवडण्यात आलेल्या के. आर. सी मार्फत गावांची तपासणी सुरू आहे. या सर्वेक्षणांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील ग्राम पंचायत बाजारभोगावं व इंजोळे या गावांची व राधानगरी तालुक्यातील ग्रा. पं. कोते या गावाची के. आर.सी मार्फत तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित गावांची देखील क्रमाने तपासणी होणार आहे.
केंद्र शासनाने निवडलेल्या या संस्थेकडुन सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.
या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाणार आहे. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे.
या सर्वेक्षणाचा महत्वाचा भाग म्हणजे या सर्वेक्षणासाठी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. यासाठी प्ले स्टोअरवरून ssg 18 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडून व कोल्हापर जिल्हयासाठी स्वच्छतेबाबत विचारलेल्या 4 प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्यावयाची आहेत. कोल्हापूर जिल्हयाला जास्तीत जास्त मते मिळतील व कोल्हापूर जिल्हा या सर्वेक्षणामध्ये अव्वल येईल. यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी या ॲपव्दारे स्वच्छता मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडीक व प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. आर.पी. शिवदास यांनी केले आहे.
(प्रियदर्शिनी चं.मोरे)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर