आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2019-20 अंतर्गत दुस-या प्रवेश फेरीस सुरूवात

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत पहिली प्रवेश फेरी पार पडलेली आहे. आता प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 15/06/2019 इ. रोजी दुसरी लॉटरी काढणेत आलेली आहे. दि. 17/06/2019 इ. रोजी NIC सेंटर, पुणे यांचेकडून दुस-या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी RTE पोर्टलवर अपलोड करणेत येणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह SMS पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application Wise Details अथवा SELECTED व NOT SELECTED या टॅबवर जाऊन आपला फॉर्म नंबर लिहून लॉटरीची खात्री करावी. ज्यांचे नाव NOT SELECTED मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी नियमानुसार पात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.

दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी RTE पोर्टलवर नमूद करणेत येणार आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्रीम. आशा उबाळे)

                                                                                शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                 जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

वॉल पेंटिंगमधून पर्यावरणाचा जागरजिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक उपक्रमांचा शुभारंभ

जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०१९ च्या औचित्याने पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील भिंतीवर पर्यावरणपूरक आणि स्वच्छता संदेशांचे वॉल पेंटिंग करून पर्यावरण पूरक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या शुभारंभ कार्यक्रमासाठी मा. डॉ. श्री आर. पी. शिवदास, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ),जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. राहुल कदम,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, तसेच मा. प्रा. श्री. संदीप दीघे, प्राचार्य, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हौसिंग कॉलेज ऑफ आर्किटेक्चर , मा. श्रीम. वंदना पुसाळकर, आकांशा नरोडे, रोहिणी कलंबे उपस्थित होते.

या वेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हौसिंग कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून भित्तिचित्रे काढण्यात आली. या वेळी रंगकाम करणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या रंगकामामध्ये पर्यावरण पूरक आणि स्वच्छता संदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाण्याचा योग्य वापर, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि स्वछता संदेश यासारख्या पर्यावरणाशी निगडित समस्यांवर आधारित वॉल पेंटिंग करण्यात आले.

या नंतर जिल्हा परिषद मुख्यालयातील रोप वाटिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचेही यावेळी उदघाटन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील बाजूस वृक्षारोपणही करणेत आले. या उपक्रमामध्ये वसुंधरा ग्रुपच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे नियोजन मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर आणि मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आला.

(प्रियदर्शिनी चं. मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर

जिल्हा परिषद मार्फत जागतिक पर्यावरण दिन(दि. ५ ते १७ जून कालावधी मध्ये ग्राम पंचायत स्तरावर विविध पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन )

          पर्यावरण संवर्धन हि सजीव सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यावश्यक गरजेची बाब आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिन ५ जून चे औचित्याने दि. ५ जून ते १७ जून २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहे.

         या उपक्रमाचा शुभारंभ हा दि. ५ जून,२०१९ रोजी  २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीची मागील बाजूस सकाळी ११. ०० वा . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे जनजागृती विषयक वोल पेंटिंग द्वारे करण्यात येणार आहे. या पेंटिंग च्या माध्यमातून पर्यावरण पूरक संदेश दिले जाणार आहेत या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

          दि. ५ जूनच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर  दि. ६ जून ते ११ जून’२०१९ या कालावधीमध्ये पंचगंगा व तिच्या उपनद्या काठावरील गावांना भेटी देऊन गावातील सांडपाणी नदीत मिसळते किंवा नाही याची पाहणी करून सांडपाणी मिसळत असल्यास त्यावर उपाय योजना आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी ग्राम पंचायत स्तरावरील १००% नळधारक कुटुंबाकडून नळांना तोट्या बसवून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दि. १७ जून,२०१९ रोजी ग्राम पंचायत स्तरावर आणि शाळांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम राबवली जाणार आहे. तसेच ज्या नळधारकांनी नळांना तोट्या बसविलेल्या नाहीत अशा नळ धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे .  या अंतर्गत रु. ५००० इतका दंड आकारला जाईल.

      या उपक्रमाबाबत सर्व गट विकास अधिकारी याना कळविणेत आले आहे. तसेच उपक्रमाच्या सनियंत्रणासाठी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुखाना  तालुके नेमून देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व पदाधिकारी व सदस्य या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. ग्राम पंचायत स्तरावर हे पर्यावरण  पूरक उपक्रम यशस्वी व्हावेत यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पदाधिकारी, ग्रामस्थ, सेवा संस्था , तरुण मंडळे, महिला बचत गट आणि स्वयंसेवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मा. सौ. शोमिका महाडीक , अध्यक्ष , जी. प. कोल्हापूर आणि मा. श्री. अमन मित्तल , मुख्य कार्यकारी अधिकारी , जि .प. कोल्हापूर यांनी केले आहे.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष

जिल्हा परिषद , कोल्हापूर

Attachments area

दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी

आज दि.12/05/2019 रोजी मा.दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विदयलाय व कनिष्ठ महाविद्यालय, तिसंगी ता. गगनबावडा येथे जि. प.कोल्हापूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत टप्पा क्र.3 साहित्य वाटप तपासणी शिबिरास मा. सभापती व उपसभापती पं. स. गगनबावडा, मा.श्री भगवान पाटील, जि. प.सदस्य, समाजकल्याण अधिकारी, जि. प. कोल्हापूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प.कोल्हापूर, गटविकास अधिकारी पं. स. गगनबावडा व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आजची नोंदणी 290 झाली आहे.

दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आज दि.11/7/2019 रोजी स.8.30 वा.दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आलासदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.सभापती स्नेहल परीट, पं. स. भुदरगड, श्री. संजय शिंदे, समाजकल्याण अधिकारी, सौ.माधुरी परीट, गटविकास अधिकारी, सौ.रेश्मा राहुल देसाई, जि. प.सदस्य, श्री.जीवन पाटील, जि. प.सदस्य, श्री. अर्जुन अबीटकर, श्री. निंबाळकर, पं. स.सदस्य, सौ. नलवडे, पं. स.सदस्या व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.सदर शिबीरमध्ये भुदरगड तालुक्यातील अंध, अस्तिव्यंग, कुष्ठरोगी, कर्णबधिर, मतिमंद मुले, इ. एकूण अंदाजे 1776 दिव्यांग व्यक्ती यांची नोंदणी करण्यात आली.सदर अभियानामध्ये मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अवयव  दानाचा फॉर्म भरण्यात आला

मतदार जागृतीसाठीसाकारली भव्य मानवी रांगोळी मतदार असल्याचा अभिमान बाळगा व मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी

 

कोल्हापूर,दि.9: कोल्हापूरातील महापालिकेच्या साडेसहा हजारावर विद्यार्थी – विद्यार्थींनीनी गांधी मैदानावर साकारली मतदान जागृतीची भव्य मानवी रांगोळी ! ‘देश का महा त्यौहार – 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी मैदानावर आयोजीत केलेल्या ‘देश का महा त्यौहार – 2019’ या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीच्या उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त्‍ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, रविकांत अडसूळ, महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असून येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने आज शहरातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थींनीनी मानवी रांगोळीने कोल्हापूरकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीने संपूर्ण गांधी मैदान निवडणूकमय झाले होते. विद्यार्थ्यांनी एका सुरात मतदार जागृतीचा नारा दिला. आजची मानवी रांगोळी हा मतदार जागृतीचा अनोखा उपक्रम शहरवासियांना अनुभवता आला. या मानवी रांगोळीच्या कार्यक्रमास निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, महापालिकेतील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षकांनी सक्रिय योगदान दिल्याने आजच्या मानवी रांगोळीतून उपस्थितांनी मतदान करण्याचाच संकल्प केला.
मतदार असल्याचा अभिमान बाळगा व मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या देश का महा त्यौहार – 2019 या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीचा हा अनोखा उपक्रम असून या उपक्रमातून मतदारांमध्ये मतदाना विषयी निश्चित जागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणूक 72 टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशाच्या महाउत्सवात सर्वांनी सहभागी होवून निवडणूका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडतील यासाठी वचनबध्द होवूया असे आवाहन करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मी मतदार आहे याचा सार्थ अभिमान बाळगून येत्या लोकसभा निवडणूकी लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनीच मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा. मतदानासाठी मिळालेली सुट्टी मतदान करुनच साजरी करा प्रत्येकाने मतदानादिवशी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
महापालिका आयुक्त्‍ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी या प्रसंगी बोलताना म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीच्या आयोजना जिल्हा प्रशासनाचे विशेषत: निवडणूक यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. महापालिकेच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी आजच्या मानवी रांगोळीत सहभागी होवून मतदान जागृतीचा संदेश शहरवासियापर्यंत यशस्वीपणे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी रांगोळीच्या सादरीकरणातून मी मतदान करणार हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला येत्या लोकसभा निवडणूकीत शहरातील सर्वच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणास सहाय्यभूत व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                                 प्रारंभी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.के. यादव यांनी स्वागत करुन मानवी रांगोळीच्या आयोजनासाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आजच्या मानवी रांगोळीमध्ये शहरातील 6 हजार 500 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाल्याचे सांगितले. शेवटी नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महापालिकेती सर्व अधिकारी/कर्मचारी, शिक्षक/शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी मानवी रांगोळीसाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या संस्था, शाळा, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजीत केलेल्या मी मतदान करणार तुम्ही पण करा या सेल्फी पॉईंटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवरांनी सेल्फी काढली. त्यानंतर या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी अक्षश: रीघ लागली. त्यानंतर मानवी रांगोळीच्या निमित्ताने राबविलेल्या मी मतदान करणार या सह्यांच्या मोहिम उपक्रमास भेट देवून सह्या केल्या. शेवटी उपस्थितांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
मानवी रांगोळी साकारण्यासाठी या उपक्रमामध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम.एल.जी. हायस्कूल, प्रि.इंदूमती देवी हायस्कूल, मनपा पी.बी. साळुंखे विद्या., एस.एम.लोहीया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इं. मि. स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, मनपा नेहरुनगर विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्या., कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, मनपा राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलसह शहरातील सर्व शाळा व हायस्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले.