LATEST NEWS
NEWS
पूरग्रस्त गावांना स्वच्छतेसाठी निधी (स्वच्छता आणि घनकचरा – सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावांना मिळणार निधी )
कोल्हापूर : दिनांक – १५ ऑगष्ट २०१९
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या गंभीर परिस्थिती मध्ये गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्ष्यात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कच-याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करावयाच्या बाबीकरिता शासनाकडून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे .
या ग्रामपंचायतींना सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रु ५०,०००/- आणि १००० पेक्ष्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये १,००,०००/- विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत घोषित केलेल्या पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाणार आहे.
या निधी अंतर्गत ग्रांमपंचायत स्तरावर खालील प्रमाणे स्वच्छेतेची कामे घेण्यात येणार आहेत.
१. गाव स्तरावरील स्वच्छेतेसाठी लागणारे अतिरिक्त रोजंदारीवर मनुष्यबळ उपलब्ध करणे.
२. सार्वजनिक स्वच्छेतेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. (धुरळणी , धूर फवारणी, निर्जंतुकीकरण साधनांद्वारे स्वच्छता करणे. इत्यादी )
३. घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे .
४. आवश्यक साधने भाड्याने घेणे.
५. स्वच्छतेसाठी आवश्यक कामे करणे.
वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही करून लोकांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही व आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी असे आवाहन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.
(प्रियदर्शिनी चं. मोरे )
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)
जिल्हा परिषद कोल्हापूर
पूर ओसरल्यानंतर साथ प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज : डॉ अर्चना पाटील, संचालक
सध्या कोल्हापूर जिल्हयामध्ये अभूतपूर्व आशी पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरस्थिती नंतर साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाचा आढावा माननीय संचालक, आरोग्य सेवा माननीय डॉ अर्चना पाटील यांनी घेतला. महापूर ओसरल्यानंतर साथ रोग प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मागदर्शन व आढावा घेण्यात आला. या प्रसंगी सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ भोई, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मा. डॉ बिलोलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी. सी. केम्पीपाटील सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ प्रकाश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ हर्षला वेदक, प्राचार्य आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केद्र डॉ सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, साथ रोग तज्ञ डॉ तावशी सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
1) प्रभावी साथ प्रतिबंधासाठी पूरग्रस्त शिरोळ, हांतकणगंले, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, पन्हाळा या तालुक्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून नोडल अधिकारी व तालुका आरोगय अधिकारी यांनी समन्वय ठेवून साथ प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा देणेचे आहे. पन्हाळा- डॉ उषादेवी कुंभार, राधानगरी- डॉ देसाई, शिरोळ- डॉ वेदक, हांतकणंगले- डॉ पी आर पाटील, कागल- डॉ सुवर्णा पाटील, करवीर- डॉ फाळके, चंदगड- डॉ व्ही .ए मोरे
2) साथरोग प्रतिबंधासाठी गृहभेटी व्दारे सर्व्हेक्षण, पाणी शुध्दीकरण, उपचार, अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पूरग्रस्त तालुक्यात आरोग्य सेवक व आशा यांची प्रतिनियुक्ती काढण्यात आली आहे.
3) पूरबाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सेवा देणेसाठी इतर जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत पूरग्रस्त क्षेत्रातील प्राथमिक आरोगय केद्रांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे पूरग्रसतासाठी तज्ञ वै्द्यकीय सेवा उपब्लध असणार आहे.
अ.नं
इतर जिल्हयाचे नांव
संख्या
नेमणूक तालुका
1
लातूर
4
हांतकणगले
2
अहमदनगर
8
शिरोळ
3
उस्मानाबाद
4
4
नाशिक
9
करवीर
5
सातारा
4
शिरोळ
4) तसेच पूरग्रस्त तालुक्यातील आर.बी.एस.के. पथक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागदर्शनाखाली वैद्यकीय सुविधा देणार आहे.
5) नगरपालिका क्षेत्रामध्ये इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगांव, गडहिंग्लज कागल या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत पूरग्रस्तासाठी विशेष आरोगय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
6) पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तथापि सनियंत्रणासाठी मंडळ स्तरावर मध्यवर्ती औषध भांडार ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या मार्फत मागणी, खर्च, पुरवठा इ. सनियंत्रणाचे कामकाज औषध निर्माण अधिकारी पाहतील.
7) पूरगस्त भागातील दैनदिनं अहवाल प्राप्त करुन घेणे, अहवाल पृथ:करण करणे, (EPIDEMIOLOGICAL ANALYSIS) एकत्रिकरण, सादरीकरण, इ मेल करणे इ काम जिल्हा एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कक्षा मार्फत करण्यात येणार आहे.
प्रसव वेदना,पुराचे थैमान आणि शासकीय यंत्रणाचा समन्वय: माता व नवजात बालक सुखरुप
प्रसव वेदना सुरु झाल्याने साखरी ता गगनबावडा येथील गरोदर माता नीता रामचंद्र खंदारे ही दि. 30 जुलै 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली. पाच वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका प्रसुती सुखरुप होणेसाठी प्रयत्न करीत होते. परंतु पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थतीमध्ये मातेची स्थिती गंभीर होण्याचा धोका असल्यामुळे व प्राथमिक आरोगय केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रणा नसलेमुळे वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी कोल्हापूरला संदर्भीत करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे-किरवे दरम्यान 200 मीटर लांब रस्त्यावर पाणी होते. परिस्थतीचे गांभिर्य ओळखून वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा अपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई यांना कळविले त्यांनी जिल्हासाथ रोग कक्षातील कार्यरत श्री संजय सोनवणे यांना माहिती देवून निवडे व कळे प्रा आ केद्राकडे संपर्क साधला. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा क्षणांचाही विलंब न लावता यंत्रणा कार्यान्वीत झाल्या. गगनबावडा पोलिसांचे पथक प्राथमिक आरोग्य निवडे येथे तत्काळ पोहचले. 108 ॲम्ब्युलन्स चे वैद्यकीय अधिकारी डॉ मानाजी पाटील, पो.नि. श्री चौगले, पो कॉ. वीर , प्रा आ केंद्राकडील वै.अ. डॉ कारंडे, आरोग्य सहाय्यक श्री अरुण मेथे, आरोगय सेवक संभाजी दुर्गुळे, ढेळेकर यांच्या मदतीने गरोदर मातेस 108 ॲम्ब्युलन्स मधून किरवे गावाजवळ आणले. तेथून स्टे्रचर वरुन सुमारे 200 मीटर अंतर कमरे एवढया पाण्यातून लोघे येथे आणले . तेथे कळे ता पन्हाळा स पो नि इंगवले अधिच 108 ची ॲम्ब्युलन्स सह उपस्थित होते. गरोदर मातेची पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य कळे ता पन्हाळा येथे तपासणी करण्यात आली त्यानंतर जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
जिल्हा अपत्ती कक्ष , जिल्हा पोलिस यंत्रणा , 108 ॲम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, कळे कडील अधिकारी कर्मचारी, यांच्या संर्तकते मुळे सर्व शासकीय यंत्रणाच्या समन्वयामुळे या गरोदर मातेची सुखरुप सुटका झाली असून या गरोदर मातेने मुलास जन्म दिला असून बाळ व बाळंतीण यांची प्रकृती चांगली आहे. या मोहिमेत मध्ये सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्त्ल, आरोग्य सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळे योगेश यांनी सांगितले.
यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 – विभागस्तरावर जिल्हा परिषद कोल्हापूर प्रथम व पंचायत समिती गडहिंग्लज द्वितीय
यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या प्रस्तावांच्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद ही पुणे विभागामध्ये पाच जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकावर आलेने मा.विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत बग़ाडे यांचे समितीमार्फत जिल्हा परिषद कोल्हापूर ची तपासणी दि.12/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर कोल्हापूर जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जि.प.उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रवि शिवदास, प्रकल्प् संचालक मा.अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) मा.रविकांत आडसुळ सर्व विषय समिती मा.सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद खातेप्रमुख व अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केलेले आहे. यानंतर जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी विभागामधुन निवड झालेने लवकरच राज्य स्तरीय समिती पडताळणीसाठी येणार आहे.
तसेच पंचायत समितीने स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. त्यानुसार विभागीय स्तरावरील निवड समिती मार्फत पंचायत समिती गडहिंग्लजची तपासणी दि.11/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर पंचायत समिती गडहिंग्लजने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. यासाठी पंचायत समिती सभापती व गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने हे यश संपादन केलेल आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)
जिल्हा परिषद कोल्हापूर
लोक संख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन
लोक संख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन.
11 जुलै 2019 जागतिक लोकसंख्या दिना निमित्त् जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत “प्रभातफेरी” चे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचे उदघाटन जिल्हा परिषदे चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत अडसूळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री भालेराव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकरी डॉ. फारुख देसाई, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मेन राजाराम हायस्कुलचे विदयार्थी, शिक्षकउपस्थित होते. तसेच सी.पी.आर. येथील नर्सिंग कॉलेज मधील विघ्यार्थीनी उपस्थित होत्या. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , शेंडा पार्क येथील प्रक्षिणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले कि, अर्माद लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी, आपु-या आरोग्य सेवा, अन्न् धान्य् तुटवडा, महागाई, स्थलांतर, पर्यावरण समस्या निर्माण झाल्या आहेत. 11 जुलै ते 24 जुलै लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन, कु.क. शस्त्रक्रिया शिबीर, तांबी बसविणे तसेच तात्पुरत्या व कायमच्या कु.क. नियोजनच्या पध्दती माहिती व जनजागृती या पंधवडयात करण्यात येणार आहे. तसेच “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“” या घोष वाक्याची या वर्षी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. डॉ देसाई उपस्थिताचे आभार मानून प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
—————————————————————————-
आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2019-20 अंतर्गत तिस-या प्रवेश फेरीस सुरूवात
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.
सदर प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्या आहेत. आता प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 10/07/2019 इ. रोजी तिसरी लॉटरी काढणेत आलेली आहे. तसेच NIC सेंटर, पुणे यांचेकडून तिस-या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी RTE पोर्टलवर अपलोड करणेत आलेली आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह SMS पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील SELECTED व NOT SELECTED या टॅबवर जाऊन अथवा Application Wise Details मध्ये आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरीची खात्री करावी. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी नियमानुसार पात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.
तिस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी हा दि. 11/07/2019 ते दि. 18/07/2019 असा निश्चित करणेत आलेला आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.
(श्रीम. आशा उबाळे)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, कोल्हापूर