केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव श्री. अनिल स्वरूप (भाप्रसे) हे प्राथमिक शिक्षण स्तरावरील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी दिनांक 06 व 07 मार्च 2017 रोजी कोल्हापूर जिल्हयामध्ये दोन दिवसीय विशेष दौ-यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील वि. मं. ऐनापूर व वि. मं. करंबळी, करवीर तालुक्यातील विकास वि. मं. सरनोबतवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील कन्या वि. मं. किणी या शाळांना भेटी देऊन प्राथमिक शिक्षणातील विविध उपक्रमांची पाहणी केली.
कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक शाळांना मिळालेले ISO मानांकन, ज्ञानरचनावाद, ABL व ई-लर्निंग असे उपक्रम तसेच इयत्ता 1ली पासून संगणक हाताळणारे विदयार्थी, अध्ययनात टॅबचा वापर, विदयार्थ्याचे संुदर हस्ताक्षर, 100% विदयार्थी उपस्थितीचा ध्वज, शिक्षकांचा अध्यापनात लॅपटॉपचा वापर, वाचन कटटा, तरंग वाचनालय, भरीव शैक्षणिक उठाव असे उपक्रम पाहून ते भारावून गेले होते. कोल्हापूर जिल्हयामध्ये राबविलेले प्रभावी उपक्रम संपूर्ण देशभरात पोहचण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे देश पातळीवर सादरीकरण करण्याची संधी त्यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपलब्ध करुन देण्यात आली. याबाबत भारत सरकारच्या लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीचे पत्र जिल्हा परिषदेस प्राप्त झाले होते.
त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे सादरीकरण नुकतेच लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी (उत्तराखंड) येथे सादर केले. यामध्ये ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पध्दती, डिजीटल शाळा, गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा कार्यक्रम, राजर्षि शाहू निवासी क्रीडा प्रशाला, हॅन्डवॉश स्टेशन, शाळा सिध्दी, लोकसहभाग अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसह जिल्हयातील निवडक शाळांच्या सादरीकरणाचा समावेश होता. या सादरीकरणानंतर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे विशेष अभिनंदन करुन कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद कोल्हापूर