जिल्हा परिषद कोल्हापूर वेबसाईट security ऑडिट दरपत्रक मागणी फेरनिविदा
ZP Kolhapur
नदी उत्सव उपक्रमांतर्गत प्रयाग चिखली येथे नदी घाट स्वच्छता मोहिम (आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता)
कोल्हापूर : 17.12.2021
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत रिव्हर्स ऑफ इंडीया या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि. 15 ते 25 डिसेंबर, 2021 या कालावधीत सेलीब्रिटींग रिव्हर्स ऑफ इंडीया या उपक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रयाग चिखली ता. करवीर येथे जिल्हा परिषदमार्फत नदी घाट परिसर स्वच्छतेच्या उपक्रमातून करण्यात आला.
स्वच्छतेची शपथ घेवून या उपस्थित सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. स्वच्छतेचे कामामध्ये सर्वांनी मनापासून सहभागी झाल्यास पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले.यावेळी मा. सौ. रसिका पाटील, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.व्ही.टी.पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जि.प.कोल्हापूर, मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जि.प.कोल्हापूर, मा.श्री. जयवंत उगले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, करवीर उपस्थित होते. तसेच ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, तरूण मंडळे, ग्रामस्थ उपस्थित होते.
नदी उत्सव उपक्रमांतर्गत जिल्हयातील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्व गावांमध्ये स्वच्छता करणेबाबत सूचना दिल्या असून, या गावांमध्ये स्वच्छता व जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ‘स्वच्छता रथ’ उदघाटन व ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : 27.09.2021
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अतर्गंत “स्वच्छता ही सेवा “ अभियान दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.
या अभियानअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे स्व्च्छता रथाचे उदघाटन कार्यक्रम आणि गाव स्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छतेचे सातत्य, स्वच्छतेची शाश्वतता राखण्यासाठी तसेच हागणदारीमुक्त् गाव अधिकच्या (ODF +) अनुषंगाने ऑनलाईन स्वच्छता संवाद उपक्रम संपन्न् झाला.स्वच्छता रथाचे उदघाटन मा. ना. हसन मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास व कामगार, महाराष्ट्र राज्य , मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री महोदय कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न् झाले.
यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी ऑनलाईन ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमांतर्गत जिल्हयातील गावस्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छता विषयक संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त आहेच आता तो हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून, यासाठी गावस्तरावर स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे आणि ग्रामीण जनतेला 55 लि. प्रति माणसी प्रमाणे पाणीपुरवठा ही कामे प्राधान्याने करणेचे आवाहन केले. तसेच, ग्राम पंचायतींनी स्वच्छतेचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात भविष्याच्या दृष्टिने संबंधित गावातील तरंगती लोकसंख्येचा ही (फ्लोटींग पॉप्युलेशन) विचार करावा. गावातील पारंपारिक नदी, नाले, ओढे यांची रूंदी पूर्ववत करावी. तसेच येत्या 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांचे 100 टक्के लसीकरण कसे होईल, याबाबत सरपंचांनी ठोस नियोजन करावे,अशा सूचना मा.पालकमंत्री यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत देशात जिल्हा अव्वल करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत आवाहन केले.
या उपक्रमासाठी मा. आमदार श्री. राजेश पाटील, मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. जयवतंराव शिंपी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा.सौ. रसिका पाटील, सभापती, अर्थ व शिक्षण समिती, जि. प. कोल्हापूर, मा. सौ. शिवानी भोसले, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जि.प. कोल्हापूर, मा. श्री. अजयकुमार माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. शंकर जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, मा. श्री. अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जि. प. कोल्हापूर, मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, (जल जीवन मिशन), जि. प. कोल्हापूर उपस्थित होते.
ऑनलाईन स्वच्छता संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील मा.जिल्हा परिषद सदस्य, मा. पंचायत समिती सभापती, मा. पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही अशा सुमारे 10,192 लोकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अधिक, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- 2021, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर स्वच्छतासंदेश देणारा स्वच्छता रथ हा जिल्हयातील गावांमध्ये फिरणार आहे. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान, प्लास्टीक संकलन, स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, स्वच्छता घोषवाक्य लेखन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.
स्वच्छता श्रमदान मोहिमेतून “स्वच्छता ही सेवा “अभियानाचा जिल्हयात शुभारंभ
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2021या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविणेत येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हयातील सर्व गावांमध्ये श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरोली (पुलाची), ता. हातकणंगले येथे मा. खासदार श्री. धैर्यशील माने यांनी स्वच्छता श्रमदान व शोषखड्डा बांधकाम शुभारंभ केला. तर ग्रामपंचायत सडोली (खालसा), ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर व मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छता श्रमदानाचे माध्यमातून अभियानाचा शुभारंभ केला. ग्रामपंचायत मसोली, ता. आजरा येथे मा. श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छता फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. गावामध्ये स्वच्छता घोषवाक्य रंगविणे स्पर्धेअंतर्गत गावामध्ये स्वच्छतेचे संदेश रंगविणेत आले. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे बांधकाम शुभारंभ व प्लास्टीक संकलन असे विविध स्वच्छता विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यासोबत पदाधिकारी व अधिकारी यांनी गावातील स्वच्छतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अभियानातील विविध स्वच्छता उपक्रमांमुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF +) होणेसाठी मदत होणार आहे.
या उपक्रमामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य, मा. सभापती, पंचायत समिती व सदस्य, पंचायत समिती, गटविकास अधिकारी सर्व, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. या अभियानाचे सनियंत्रण मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत येत आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 42 हजार मुर्ती संकलन
दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत एकूण 242191 मुर्ती संकलन तर सुमारे 500 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत ü 2908 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. राहूल पाटील यांनी केले होते. उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेणेसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सभापती यांना आवाहनपत्र देणेत आलेली होती.
या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपक्रम यशस्वी करणेसाठी तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविणेसाठी व ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करणेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना समन्वयासाठी ग्राम पंचायती देण्यात आलेल्या होत्या. उपक्रम यशस्वी करणेसाठी मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत सडोली खा., ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायतस्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. तसेच ग्राम पंचायत टोप, ता. हातकणंगले येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सर्व सन्माननिय सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य तसेच लोकप्रतिनीधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.