प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कटीबध्द रहावे : नंदकिशोर गांधी
(जिल्हा स्तरीय प्लॅस्टिक बंदी अधिसूचना अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न)
कोल्हापूर : दि. 21.06.2018
प्लॅस्टिक बंदीबाबत ग्रामीण भागात जनजागृतीसोबतच अधिसूचनेतील नियमांची काटेकोर अंमजबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यानी जिल्हा परिषद कार्यशाळेत व्यक्त केले. लोककला केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक, अर्थ व शिक्षण समिती सभापती मा. श्री. अंबरिश घाटगे, पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) मा. श्री. चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. कुणाल खेमनार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रविकांत अडसूळ, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य मा. श्रीम. सुषमा देसाई आदी उपस्थित होते.
मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रात विविध योजनांव्दारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर काम सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातही प्लॅस्टिक वापर मोठया प्रमाणात वाढल्याने 23 मार्च, 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून महाराष्ट्रात प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी घातली. या अधिसूचनेबाबत लोकांना माहिती व्हावी तसेच अंमलबजावणी यंत्रणेला अधिसूचनेच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सर्व तालुकयांचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ग्राम पंचायतींचे ग्रामसेवक अशा एक हजार प्रशिक्षणार्थींची कार्यशाळा घेणेत आली.
या वेळी गांधी यांनी प्लॅस्टिक वापराबाबत कायदे-नियम, त्याचे तोटे, पर्यावरणावरील दुष्परिणाम, प्लॅस्टिकला पर्याय या विषयांवर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले आज वस्तूंच्या वेष्टनापासून ते अगदी हृदयाच्या कृत्रिम झडपांपर्यंत प्लॅस्टिकचा वापर होत आहे. पण तरीही मुळ वैज्ञानिक दृष्टीकोन जपून पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही या पध्दतीने प्लॅस्टिकचा वापर केला पाहीजे. त्यामुळे प्लॅस्टिकपासून पर्यावरणाला, आरोग्याला निर्माण झालेला धोका याबाबतची माहिती सर्वांना द्यावी लागेल आणि यासाठी शासनाच्या प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेची अंमलबजावणी शंभर टक्के करावी. यानंतर मा. श्री. मिलिंद पैजार यांनी प्लॅस्टिक आणि त्याचा मानवी शरीरावर होणार घातक परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. या सादरीकरणा दरम्यान विविध लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्री. सचिन पाटील हे मागील 8 वर्षे ते आपल्या ग्राहकांना प्लॅस्टीक पिशवी न देता व्यवसाय करीत असल्याचे सांगितले व त्यांचे अनुकरण करणेसाठी आवाहन केले.
यावेळी उपायुक्त मा. श्री. चंद्रकांत गुडेवार यांनी प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचना अंमलबजावणीबाबत माहिती दिली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत यशस्वीरित्या केली जाईल याबाबत आश्वासन दिले.
कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या प्रती तसेच नंदकिशोर गांधी यांच्या प्लॅस्टिक या विषयावर आधारित माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार मा. श्री. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी आधिकारी (ग्रा.पं.) यांनी व्यक्त केले तर कार्यशाळेचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले.