मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये ज्या दूर्धर रोगांनी मानवाच्या शारिरिक, आर्थिक स्थितीवर विघातक परिणाम केले आहे त्यामध्ये पोलिओचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पोलिओ हा आजार विषाणूंमुळे होतो.
त्यासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना नियमित लसीकरणा व्यतिरिक्त पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यालाच पल्स पोलिओ लसीकरण म्हणतात. मुलांमध्ये रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होण्याबरोबरच शरीरातुन संडासवाटे बाहेर पडणारा लसीचा विषाणू रोग होणा-या पोलिओ विषाणुची जागा घेईल व त्यामुळे वातावरणातील पोलिओ विषाणु नष्ट होईल. परिणामी बालकांना पोलिओची बाधा होण्याची शक्यता नष्ट होवून संपूर्ण भारतामध्ये पोलिओचे समूळ उच्चाटन होईल. भावी पिढीवर पोलिओमुळे उदभवणारे अपंगत्वाचे सावट कधीही पडणार नाही.
महाराष्ट्र शासनामार्फत १९९५-९६ पासून गेली १६ वर्षे पल्स पोलिओ कार्यक्रम मोहिम या स्वरुपात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ३८ सत्रे राबविण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्हयातील शेवटची पोलिओ केस दि.२३ ऑगस्ट, १९९९ मध्ये शाहुवाडी तालुक्यातील करंजोशी या गावी आढळली होती. त्यानंतर आजअखेर एकही पोलिओ रुग्ण कोल्हापूर जिल्हयात आढळला नाही. अशा रीतीनी कोल्हापूर जिल्हयाची पोलिओ निर्मुलनाकडे यशस्वी घोडदौड सुरु आहे.