राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्रामअभियान

 एक पाऊल पुढे; सुदृढ निरोगी महाराष्ट्राकडे !!

महाराष्ट्र राज्य हे देशातील एक पुरोगामी राज्य असून आर्थिक व भौतिक प्रगतीमध्ये देशामध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्राची आर्थिक व भौतिक प्रगती होत असली तरी मानवी विकासा बाबत अजूनही भरीव कामगीरी करणे आवश्यक आहे. यामध्ये कुपोषणाची समस्या राज्यापुढे एक आव्हान आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

तथापि, शाश्वत कुपोषणमुक्तीचा विचार करतांना शासकीय यंत्रणे बरोबर समाजाच्या प्रत्येक घटकांचा सक्रिय सहभाग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्रामअभियान राज्यामध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ २ ऑक्टोबर २०११ रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. हे अभियान दि. १४ नोव्हेंबर २०११ ते दि. ७ एप्रिल २०१२ (राष्ट्रीय बाल दिन ते जागतिक आरोग्य दिन) या कालावधीमध्ये राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालके वयाप्रमाणे वजनानुसार साधारण श्रेणी मध्ये असणे, हे ध्येय निश्चित्त करण्यात आले आहे. हे ध्येय साध्य केल्यास राज्यातील सर्व बालके सुदृढ, निरोगी व बुध्दीमान होतील.

अभ्यासावरुन असे दिसून आले आहे की, पहिले १ हजार दिवस (-९ ते २४ महिने म्हणजेच गर्भधारणेपासून बाळ २ वर्षाचे होईपर्यंतचा काळ) अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण याच काळात शारीरीक वाढीसोबत बाळाच्या मेंदूची वाढ व विकास ९०% होत असतो.

 

अभियानाची उद्दिष्टये :-

  • महाराष्ट्र राज्य कुपोषणमुक्त करणे अर्थात राज्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके साधारण () श्रेणीत आणणे.
  • स्थानिक स्वराज्य संस्था जसे – ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा सक्रिय सहभाग वाढवून कुपोषणमुक्त ग्राम संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे.
  • शा्श्‍वत कुपोषणमुक्तीसाठी लोकसहभागास प्रोत्साहन देऊन समाजाच्या सर्व घटकांना या विषयाशी जोडून एक लोकचळवळ उभी करणे.