पाच दिवसांच्या ताराराणी महोत्सवास सुरुवात
कोल्हापूर, दि. 6 : जिल्हयात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसहाय्य उपलब्ध करुन देऊन बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच जिल्हयात बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च् प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास माध्यमातून येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या महिला स्वयंसहय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाच्या जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. समारंभास महापौर सरिता मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास सभापती शुभांगी मगदूम, जिल्हा परिषेदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, हेमंत कोल्हेकर, श्रीमती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कला गुणांना वाव दिल्यास तसेच त्यांना संधी उपलब्ध झाल्यास त्या संधीच सोनं करतात असा विश्वास व्यक्त करुन अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलिकरणाची महत्वपुर्ण काम होत असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा प्रयत्नशिल आहे. बचत गटातील महिलांना बाजारपेठांचा अभ्यास करुन विविध व्यवसाय निवडावेत, तसेच त्या व्यवसायाबाबत कौशल्य प्रशिक्षण घेणेही तितकेच महत्वाचे आहे. यंदाच्या ताराराणी महोत्सवात 162 स्टॉलची उभारणी केली असून बचतगटाच्या उत्पादनाना विक्रीसाठी ताराराणी महोत्सव हे महत्वपुर्ण दालन असल्याचेही त्या म्हणाल्या.
महापौर सरिता मोरे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, बचतगटांच्या मध्यमातून महिला सक्षमीकरणाच महत्वपुर्ण काम होत असून महिलांनी नोकरीच्यामागे न लागता बचतगटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय उद्योगामध्ये सक्रीय होऊन आर्थिकदृष्टया सक्षम बनावे,बचत गटातील महिलांना प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत आणि सहकार्य केले जाईल. असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविका सांगितले की , जिल्ह्यातील बचत गटांनी भरीव कामगिरी करुन कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ताराराणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध जिल्ह्यातील 162 समूहांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कोल्हापूरवासींनी आगामी 4 दिवसात ताराराणी महोत्सवास भेट देऊन बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ताराराणी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर एन. जी. देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समारंभास नाबार्डचे सहाय्यक महा प्रबंधक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, स्टेट बॅुकेचे जिल्हा समन्वयक निलेश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. भालेराव, रविद्र आडसुळ, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी, सम्राट पोतदार, राजेंद्र जाधव यांच्यासह पंचायत समितीच्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, अधिकारी आणि बचतगटांच्या महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.
