प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत व नैदानिक चाचणी सन 2017-18

शिक्षण हक्क कायदयातील कलम 29(2)(ह) नुसार मूल्यमापन पध्दतीद्वारे विदयार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कायद्यातील या अपेक्षा आणि तरतुदी विचारात घेऊन दिनांक 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयानुसार राज्यात इयत्ता 1 ली ते 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दती लागू केली आहे.

वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या मुलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास          ज्ञानग्रहन आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. यामध्ये एकही मुल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विदयार्थ्याच्या पायाभूत संपादणूकीची नियमित पडताळणी करुन शैक्षणिक दर्जा ंउंचावण्यासाठी गरजाधिष्ठित कृती कार्यक्रमाची आखणी करणे तसेच ज्या इयत्तेत बालक शिकत आहे त्या इयत्तेच्या क्षमतांचीही संपादणूक वेळच्या वेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणेत आला आहे. त्यांतर्गत सन 2017-18 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करणेत आले आहे. यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 या तीन चाचण्यांचा समावेश आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांच्या किमान अपेक्षित क्षमता संपादणूकीची खात्री करणे व गुणवत्ता तपासणे आणि सुधारणे हा या चाचण्यांचा हेतू आहे.

सन 2017-18 मध्ये इयत्ता 2 ते 8 साठीची पायाभूत चाचणी सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता 2 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. तसेच इयत्ता 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी (राज्य मंडळ) संलग्नित असलेल्या राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9 वी तील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. सदर चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावरुन प्रश्नपत्रिका पुरवून दिनांक 7 व 12 सप्टेंबर 2017 या कालावधीत खालीलप्रमाणे करणेत आले आहे.

 

इयत्ता विषय दिनांक वेळ
इ. 2 री ते इ. 9 वी प्रथम भाषा 7 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 2 री ते इ. 9 वी गणित 8 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 3 री ते इ. 9 वी इंग्रजी (तृतीय भाषा) 11 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 6 वी ते इ. 9 वी विज्ञान 12 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00

 

.  जिल्ह्यातील 3595 शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 413970 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. तर जिल्ह्यातील 858 शाळांमध्ये नैदानिक चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 61114 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत.

सदर चाचणी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना कळविणेत आले आहे. चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी, प्रात्यक्षिक इतर दिवशी घेण्याबाबतचे नियोजन शाळास्तरावर करणेत येणार आहे. सदर पायाभूत चाचणीचे शाळास्तर संनियंत्रण करणेसाठी जिल्हास्तरावरून 12 अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.

श्री. सुभाष चौगुले

                                                                                        शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                         जिल्हा परिषद, कोल्हापूर