जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करणेसाठी अभियान राबविणेत आले असून त्यासाठी जिओफेन्सिंग मोबाईल अँप द्वारे पाण्याचे नमुने घेणेत आले आहेत.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत जिओ फेन्सिंग मोबाईल अँप द्वारे पाण्याचे नमुने गोळा करणेचे काम १ मार्च ते १५ जून या कालावधीत करणेचे शासनाचे आदेश होते त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात जिओफेन्सिंग मोबाईल अँप चा वापर करून पिण्याच्या पाण्याचे एकूण स्त्रोत ३६४७ पैकी ३६३८ गोळा करणेत आले आहेत. २ वर्षांपूर्वी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे १००% टॅगिंग करणेत आले आहे. टॅगिंग केलेल्या स्त्रोतांना प्रत्यक्ष भेट दिली असून त्यापैकी पाण्याची उपलब्धता असणा-या २५८० स्त्रोतांचे नमुने तपासनेसाठी प्रयोगशाळेत पाठविणेत आलेले आहेत. उर्वरित १२७७ स्रोतांपैकी काही स्रोत विविध कारणांमुळे बंद , कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, कोरडे, आढळून आलेले आहे. सर्वेक्षणातून घेतलेल्या सर्व पाणी नमुन्याची तपासणी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोग शाळा, कोल्हापूर व उपविभागीय प्रयोगशाळा शिरोळ, कोडोली, सोळांकूर,गडहिंग्लज या प्रयोगशाळेत करणेत येत आहेत.
या अभियानात जिल्हा स्तरावरून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाने तालुका व ग्रामपंचायत स्तरापर्यंत केलेल्या नियोजनामुळे हे काम शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण झाले. सदर कामास तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी गुणवत्ता सल्लागार यांनी व ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य सेवक व जलसुरक्षक यांनी प्रत्यक्ष काम पहिले. तसेच जिल्हा स्तरावर पाणी व स्वच्छता विभागातील सर्व जिल्हा तज्ञांनी आपापले तालूक्यात समन्वय ठेवून हे काम पूर्ण केले आहे.
सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे सॅटेलाईट द्वारे टॅग करणेसाठी शासनाने नागपूर येथील MRSAC या संस्थेला जबाबदारी दिली होती जिओफेन्सिंग हे एक मोबाईल अँप असून हे अँप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने गोळा करणेसाठी वापरतात. स्रोतांच्या १० मिटर परिघात गेल्यावर अँप सुरु करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करणेत येऊन फोटो घेऊन नमुना घेणेत येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासयनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते. तसेच सदरचे उद्दिष्ट गेल्या २ वर्षात प्रथमच १०० % पूर्ण झाले आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्रीम. प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले आहे.