छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व श्री महालक्ष्मीचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेला व दक्षिण काशी म्हणून ख्यातनाम असलेला तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जोतिर्लिंगाचे ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला व गडकोट किल्ल्याने वेढलेला सुजलाम सुफलाम असा हा कोल्हापूर जिल्हा कोकण पट्टीच्या पुर्वेकडील सहयाद्रीच्या रांगामध्ये व महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस वसलेला आहे. या जिल्हयात वेदगंगा, दुधगंगा, हिरण्यकेशी, तुळशी, वारणा, पंचगंगा, कासारी, भोगावती नदया प्रवाहीत असून राधानगरी, तुळशी, काळम्मावाडी, पाटगाव इ. मोठी धरणे बांधलेली असून त्याचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी होत असतो. तसेच तिलारी, राधानगरी येथे विदयुत निर्मितीचा मोठा प्रकल्प कार्यरत आहे.
कोल्हापूर जिल्हयाचे क्षेत्रफळ ७,६२० चौ.कि.मी. असून यामध्ये १२ तालुक्याचा समावेश आहे. जिल्हयाची एकुण लोकसंख्या २९,७९,५०७ आहे. जिल्हयाचे हवामान विषम असून सरासरी पर्जन्यमान १६००-१७०० मि. मि. आहे. जिल्हयात एक महानगरपालिका, ९ नगरपालिका आहेत. जिल्हयाच्या प्रशासनाचे मुख्यालय कोल्हापूर असून ते पुणे-बेंगलोर महामार्गावर आहे. कोल्हापूर जिल्हा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असून एकुण १९ साखर कारखाने कार्यरत आहेत.
दरडोई आर्थिक उत्पन्नामध्ये भारतात अग्रेसर असणार्या कोल्हापूर जिल्हयाची ग्रामिण अर्थव्यवस्था पशुसंवर्धनावर मुलतः अवलंबुन आहे.ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाचा दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय असुन कोल्हापूर जिल्हयाचे दर दिवसाला १५ लक्ष लिटर अधिक दुध उत्पादन आहे. यामुळे पशुसंवर्धन खात्याने जिल्हयात पशुवैद्यकिय सेवा व पशुसंवर्धनाच्या विविध योजना तसेच – पशुवैद्यकिय सेवेतुन ग्राम समृध्दी, उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार, सोनोग्राफी मशिनव्दारे वंधत्व निर्मूलन कार्यक्रम, अत्याधुनिक फिरता पशुवैद्यकिय दवाखाना या नाविण्यपुर्ण योजना राबवुन महाराष्ट्रात इतर जिल्हयांना एक मार्गदर्शन ठरत आहे. प्रभावीपणे राबवुन सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हयामध्ये दवाखाना इमारतीची बांधकामापासुन ते पशुसंवर्धन विषयक स्वयंरोजगार निर्मिती करीता विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. प्रशासकिय व तांत्रिक कामात यामुळेच जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कार्य व उद्दिष्टे :-
- गोपालकांना पशुवैदयकिय सेवा पुरविणे.
- संकरीत गोपैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
- रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे
- कुक्कुट विकास, शेळी-मेंढी विकास करणे
- वैरण विकास कार्यक्रम राबविणे.
- पशुपालनातून स्वयंरोजगार निर्मिती करणे
- जिल्हा परिषद, राज्य शासन, केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विषयक विविध योजना राबविणे.
- पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
- प्रचार व प्रसार योजना राबविणे.