दि. १५ जून २०१७ रोजी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची अंमलबजावणी

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची १०० % पटनोंदणी होणेकरिता शाळेच्या प्रथमदिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या प्रथम दिनी म्हणजेच १५ जून २०१७ इ. रोजी शाळेमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे फुल देवून स्वागत करणेत येणार आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबविणेत येणार आहेत. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांची नियोजन बैठक, गटस्तरावर मुख्याध्यापक कार्यशाळा, शाळापूर्व तयारी, शाळांची जाहिरात पत्रके, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, पटनोंदणी प्रभात फेरी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रथम दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी यांनी सक्रीय सहभागी होणेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी आवाहन केले आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविणेत येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती (ABL), डिजीटल शाळा, ISO शाळा मानांकन अशा उपक्रमांची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविणेत येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याची अपेक्षा या आवाहनाव्दारे करणेत आलेली आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर