कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असून, शाळांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. इतर राज्यांतील शिक्षक, अधिकारी व मान्यवरांनी या शाळा पाहाव्यात, असे चांगले उपक्रम शाळा-शाळांमधून राबविले जात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या आणि कामकाजाचे कौतुक केले.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची पटसंख्या १४२ असून, शाळेला ‘आयएसओ मानांकन’ प्राप्त झाले आहे. शाळेमधील ज्ञानरचनावाद, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण, तिसरीपासून सातवीपर्यंत संगणक हाताळणारे विद्यार्थी, साडेतीन लाख रुपयांच्या लोकसहभागातून केलेला शैक्षणिक उठाव, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश स्टेशन, सुसज्ज रंगकाम या भौतिक सुविधा पाहून सचिव प्रभावित झाले. अभिनव पालकर याचा देशापातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करतानाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण ऐकूनही त्यांनी समाधान व्यक्त केले. याच तालुक्यातील करंबळी तालुक्यातील सहावीचे ३४ विद्यार्थी टॅबचा वापर करतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील शिक्षक अध्यापनात स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात त्याचे सचिवांनी कौतुक केले. कन्या विद्यामंदिर (ता. हातकणंगले)येथील लेझीम पथक, पहिलीच्या वर्गात राबविण्यात येणारा शब्दांचा डोंगर व शब्दांची अंताक्षरी याचे वाचन त्यांनी घेतले. जिल्ह्णातील चांगले उपक्रम पाहण्यासाठी राज्यातील शिक्षक कोल्हापूरला येतील असे स्वरूप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सभापती मीना पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले त्यांच्यासमवेत होते.