भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दि. 5 सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करणेत येतो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 20 गुणवंत शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामकाजाबद्दल 2 शिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 05 सप्टेंबर 2017 इ. रोजी दुपारी 3.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करणेत आला होता.
सदर कार्यक्रम मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षेखाली व मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर, मा.आमदार श्री.चंद्रदीप नरके यांच्या शुभहस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.
प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सुभाष चौगुले, यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती विद्यार्थी गुणवत्ता, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी व शाळांच्या गुणवत्तेच्या संदर्भात सर्वंकष आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये सभापती अर्थ व शिक्षण, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनीजिल्हा परिषदेच्या 100% शाळा डिजिटल करणेचा संकल्प व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेमार्फत स्वत:चे सॉफ्टवेअर विकसित करुन सर्व शाळांना पुरविणेत येईल असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सुजाण विद्यार्थी अभियान राबविणेत येणार असलेचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील शिक्षणातील गुणवत्तेचा उहापोह करत विद्यार्थी विकासामध्ये शिक्षकांचे महत्व विषद केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी बहुमोल योगदान देण्याचे आवाहन केले.
मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात, शिंगणापूर क्रीडा प्रशाला ही राज्यामध्ये आदर्श प्रशाला म्हणून काम करीत आहे. तसेच शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणेसाठी व शाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करु असे सांगितले.
मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर यांनी पुरस्काराने व्यक्तीचा सन्मान होतो, अधिक प्रेरणेचे काम करण्याची ऊर्जा मिळते.जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे. राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकाचं योगदान मोलाचे आहे याची जान ठेवून प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट कामकाज करुन बलशाली, सामर्थ्यशाली भारत घडविणेच्या दृष्टीने योगदान दयावे, तसेच डॉ.राधाकृष्णन, डॉ.जे.पी.नाईक या सारख्या विचारवंताचे विचार आचरणात आणावेत असे सांगितले. तसेच शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना व कामकाजाबाबत आपण समाधानी असलेचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांचे राष्ट्र उभारणीमधील योगदान यांचे महत्व विषद करुन शिक्षक पुरस्कार निवडीवेळी जिल्ह्यामध्ये शिक्षक ज्ञानदानामध्ये त्यागवृत्तीने उत्कृष्ट योगदान देत असलेबद्दल दिसून आले याबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.विशांत महापुरे, समाजकल्याण सभापती, मा.श्री.सर्जेराव पाटील (पेरीडकर), बांधकाम सभापती, मा.सौ.शुभांगी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती, मा.श्री.इंद्रजित देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व सन्माननिय जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.