जिल्हा परिषद, कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ सनराईज ,कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने “रचनावाद- एक नवी दिशा“ या कार्यशाळेचे आयोजन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मौनी विदयापीठ, गारगोटी, ता.भुदरगड येथे दि.27/03/2017 इ.रोजी करणेत आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले म्हणाले, “बालकाच्या प्रगतीच्या दृष्टीने ज्ञानरचनावादी पध्दतीचे शिक्षण आवश्यक आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी कृतीयुक्त अध्यापनाद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे. रचनावाद समजून वर्गातील प्रत्येक बालक प्रगत करणेसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. बालकाला समजून घेताना त्याचे बालमानसशास्त्र समजून घेणे, मानवी मेंदूची रचना समजून घेणे आवश्यक आहे. रोटरीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी TEACH या उपक्रमामधून राबविले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत.”
या कार्यशाळेत भूदरगड तालुक्यातील 166 शिक्षक, सर्व केंद्रप्रमुख यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमंत माईसाहेब बावडेकर संस्थेच्या अध्यक्षा नितूदेवी बावडेकर यांनी सहज सोप्या भाषेत रचनावाद, मेंदूचा विकास समजावून दिला. ज्ञानरचनावादाची संकल्पना तत्वे यामध्ये शिक्षकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. गटकार्य अनौपचारिक चर्चा यातून रचनावादाचे महत्व त्यांनी अधोरेखीत केले.
कार्यशाळेचे उद्घाटन रोटरीचे प्रेसिडंट सचिव झंवर यांचे हस्ते करणेत आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी,भुदरगड दिपक मेंगाणे, जिल्हा शिक्षणविस्तार अधिकारी दिपक कामत, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य अर्जून आबिटकर, रोटरी सेक्रटरी कालेकर,केदार कुंभोजकर ,शिशिर शिंदे, अशोक भोई हे उपस्थित होते. सुत्रसंचालन पी.डी.कांबळे यांनी केले.