जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकांऱ्यांच्या कडून शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेचे कौतूक
राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला येथे उच्चस्तरीय समिती सभा दिनांक 17/04/2017 रोजी संपन्न झाली. जिल्हा परिषदे मार्फत शिंगणापूर येथे निवासी क्रीडा प्रशाला जून 2014 पासून सुरु झाली. हा जिल्हा परिषदेचा एक नाविण्यपूर्ण उपक्रम असून गेल्या तीन वर्षामध्ये निवासी क्रीडा प्रशालेतील खेळाडूंनी वेगवेगल्या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पदके मिळवून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकारी यांनी शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेचे कौतूक केले.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवनियुक्त अध्यक्षा, उपाध्यक्ष व सभापती यांनी क्रीडा शाळेचा हेतू, प्रशालेचे स्वरुप, प्रशालेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जातात, शाळेची प्रगती काय आहे हे जाणून घेणेसाठी शिंगणापूरच्या राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतन मध्ये सोमवार दिनांक 17/04/2017 रोजी उच्चस्तरीय धोरण समिती सभा संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. कुणाल खेमणार, उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाळासाहेब पाटील, कार्यकारी अभियंती श्री. तुषार बुरुड, शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री. टी. एल. मोळे उपस्थित होते.
यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेमध्ये मुलींसाठी नविन बांधणेत आलेले स्वच्छतागृह व वॉचमन केबिनचे उद्घाटन मा. अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्या हस्ते करणेत आले. सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी परिसराची पाहणी करुन वृक्ष लागवड व्हावी व ऑक्सीजन पार्क व्हावा अशा सूचना केल्या. सभेमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सुभाष चौगुले यांनी पी.पी.टी व्दारे शाळेविषयी पुर्वीचा इतिहास, निवासी क्रीडा प्रशाला सुरु करणेचा उद्देश, मागील तीन वर्षाचा प्रगतीचा आढावा तसेच प्रस्तावित कामे या विषयाचे सादरी करण केले. प्रशासन अधिकारी श्री दिपक कुंभार यांनी अर्थिक वर्ष 2016-17 चा अर्थिक अहवाल सादर केला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री कुणाल खेमणार यांनी प्रस्तावित कामासंदर्भात उदा. मैदान सपाटीकरण, शुध्द पिण्याचे पाण्याची सोय, सोलर हिटर, वसतीगृहातील अभ्यासिका, खेळाडूंना लागणा-या सर्व साहित्याची तसेच अद्यावत व्यायामशाळा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी परिसराचे सपाटीकरणकरुन वृक्ष लागवड करावी, विदयार्थ्याची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंची व्याख्याने आयोजित करावीत अशा सूचना केल्या. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी प्रशालेस कोणाताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.
जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतूक करुन शाळेची प्रगती अतिशय चांगली असून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.