केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून दिनांक ०१ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये ‘ स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा ’ आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या निकालानुसार देशामध्ये प्रथम क्रमांक गिरिधीह (झारखंड),द्वितीय क्रमांक कोल्हापूर (महाराष्ट्र), तर तृतीय क्रमांक पेडापल्ली (तेलंगणा) असे क्रमांक प्राप्त झाले आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाने आपले शौचालय स्वच्छ, सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्प्ष्टपणे नजरेत याव्यात या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत या स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांचा पुढाकार व स्थानिक संस्था, सर्व शाळा, ग्रामस्थ, विध्यार्थी यांचा सहभाग घेऊन “ स्वच्छ सुंदर शौचालय “ स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम होणे आवश्यक होते. वैयक्तिक तसेच शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय रंगविण्याची व्यापक मोहीमेमध्ये सर्व स्तरावरील लोक सहभाग व शासकीय यंत्रणांचे योगदान मिळावे यासाठी दिनांक २८ जानेवारी २०१९ हा दिवस १ दिवस शौचालयासाठी म्हणून घोषित करणेत आला होता. या मध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, व ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत जिल्हयात एकूण ४,३१,५८४ इतकी वैयक्तीत शौचालय रंगविण्यात आली. तसेच ८,४१९ इतकी सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय रंगविण्यात आली.या स्पर्धेदरम्यान मा. सौ. शौमिक महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी गावांमधे स्वतः शौचालय रंगकाम करून लोकांना शौचालय रंगविणेसाठी प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मा. जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच सर्व गटविकास अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम या मुळे हे यश मिळविता आले आहे.दिनांक २४.०६.२०१९ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे ‘स्वच्छ महोत्सवाचे’ आयोजन करणेत आले असून या महोत्सवामध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे बक्षीस वितरण देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या बक्षीस वितरण समारंभासाठी मा. सौ. शौमिक महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.), श्री. विजय पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (पा.व स्व.), सौ. सुवर्णा कारंडे, सरपंच, सावर्डे दु., ता. करवीर, सौ. सुनीता पाटील, सरपंच, पेंढाखळे ,ता. शाहूवाडी, श्री. सिद्दाप्पा करगार, स्वच्छागृही, ता. गडहिंग्लज, श्री. रोहित भंडारी, स्वच्छागृही, ता. राधानगरी हे उपस्थित राहणार आहेत.
(प्रियदर्शिनी चं. मोरे )
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)
जिल्हा परिषद कोल्हापूर