स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: 31.07.2018

 

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाला.

या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक, जि. प. कोल्हापूर, जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीम. सुषमा देसाई, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. वंदना मगदूम , जेष्ठ जि. प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, मा. सौ. संध्याराणी जाधव, जि. प. सदस्य  यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम या सर्वेक्षणबाबत तयार करण्यात आलेल्या प्रसिध्दी फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनतर जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक, समिती सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छतेमध्ये नेहमीचं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरचे पुरस्कार ही मिळविले आहेत. यशाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या सर्वेक्षणासाठी ग्राम स्तरावर आवश्यकत ते सर्व प्रयत्न करावेत असे मा.अध्यक्षा यांनी सांगितले. तर या सर्वेक्षणामध्ये स्वच्छता ॲपव्दारे ग्रामस्थांची मते नोंदविली जाणार असल्याने हे ॲप सर्व ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी तालुका व ग्राम स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. या सर्वेक्षणबाबत तयार करण्यात आलेल्या हस्तपत्रिकांचे प्रकाशन ही या वेळी करण्यात आले.

            सर्व्हेक्षणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडुन यादृच्छिक  पध्दतीने केली जाणार आहे. जिल्हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्हेक्षणासाठी सज्ज राहावे लागणार आहे. केंद्र शासनाने निवडलेल्या संस्थेकडुन पहिल्या टप्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण  होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्या स्वच्छतेबाबतच्या व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्यात येणार आहेत.

“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हयातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणा-या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण अंतर्गत सन 2012 मध्ये    झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राहय धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती स्वच्छता व्याप्ती साठी घेतली जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.

या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षणाचे गुणांकन खालील प्रमाणे होणार आहे.

  • ÃÖ¾ÆìüÖÖÖŸÖᯙ गुणांकन पध्दती

अ) सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरिक्षण                                                               (30 गुण)

यामध्ये शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचा वापर, कच-याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या घटकांची पडताळणी होणार आहे.

ब) नागरीकांचे तसेच मुख्य प्रभावी व्यक्तींची स्वच्छतेबाबतची मते, माहिती अभिप्राय (चर्चेव्दारे व  ऑनलाईन  ॲपव्दारे)  –                                                                                      ( 35 गुण)

       

यामध्ये अभियानाबद्दल जाणीव जागृती, नागरीकांचे ऑनलाईन अभिप्राय,प्रभावी व्यक्तींचे अभिप्राय घेतले जाणार आहे.

क) स्वच्छता विषयक सद्यस्थिती-स्वच्छतेसंबंधीची विविध मानकांची जिल्हयांने केलेली प्रगती-    ( 35 गुण)

यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारी मुक्तीची टक्केवारी, हागणदारी मुक्त पडताळणी टक्केवारी, फोटो अपलोडींग व नादुरुस्त शौचालयांची उपलब्धता यांचे गुणांकन होणार आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उप. मु. का.अ (पा. व स्व.) यांनी केले तर स्वच्छता सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती श्री. विजय पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, पाणी व स्वच्छता यांनी दिली. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, उपअभियंता (ग्रा.पा.पु.) गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मा. श्री. संजय कुंभार, लेखाधिकारी, (पा. व स्व.) यांनी मानले व कार्यक्रम संपला.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर