कोल्हापूर,दि.9: कोल्हापूरातील महापालिकेच्या साडेसहा हजारावर विद्यार्थी – विद्यार्थींनीनी गांधी मैदानावर साकारली मतदान जागृतीची भव्य मानवी रांगोळी ! ‘देश का महा त्यौहार – 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी मैदानावर आयोजीत केलेल्या ‘देश का महा त्यौहार – 2019’ या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीच्या उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त्ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, रविकांत अडसूळ, महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असून येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने आज शहरातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थींनीनी मानवी रांगोळीने कोल्हापूरकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीने संपूर्ण गांधी मैदान निवडणूकमय झाले होते. विद्यार्थ्यांनी एका सुरात मतदार जागृतीचा नारा दिला. आजची मानवी रांगोळी हा मतदार जागृतीचा अनोखा उपक्रम शहरवासियांना अनुभवता आला. या मानवी रांगोळीच्या कार्यक्रमास निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, महापालिकेतील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षकांनी सक्रिय योगदान दिल्याने आजच्या मानवी रांगोळीतून उपस्थितांनी मतदान करण्याचाच संकल्प केला.
मतदार असल्याचा अभिमान बाळगा व मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या देश का महा त्यौहार – 2019 या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीचा हा अनोखा उपक्रम असून या उपक्रमातून मतदारांमध्ये मतदाना विषयी निश्चित जागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणूक 72 टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशाच्या महाउत्सवात सर्वांनी सहभागी होवून निवडणूका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडतील यासाठी वचनबध्द होवूया असे आवाहन करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मी मतदार आहे याचा सार्थ अभिमान बाळगून येत्या लोकसभा निवडणूकी लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनीच मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा. मतदानासाठी मिळालेली सुट्टी मतदान करुनच साजरी करा प्रत्येकाने मतदानादिवशी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
महापालिका आयुक्त्ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी या प्रसंगी बोलताना म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीच्या आयोजना जिल्हा प्रशासनाचे विशेषत: निवडणूक यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. महापालिकेच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी आजच्या मानवी रांगोळीत सहभागी होवून मतदान जागृतीचा संदेश शहरवासियापर्यंत यशस्वीपणे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी रांगोळीच्या सादरीकरणातून मी मतदान करणार हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला येत्या लोकसभा निवडणूकीत शहरातील सर्वच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणास सहाय्यभूत व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.के. यादव यांनी स्वागत करुन मानवी रांगोळीच्या आयोजनासाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आजच्या मानवी रांगोळीमध्ये शहरातील 6 हजार 500 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाल्याचे सांगितले. शेवटी नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महापालिकेती सर्व अधिकारी/कर्मचारी, शिक्षक/शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी मानवी रांगोळीसाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या संस्था, शाळा, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजीत केलेल्या मी मतदान करणार तुम्ही पण करा या सेल्फी पॉईंटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवरांनी सेल्फी काढली. त्यानंतर या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी अक्षश: रीघ लागली. त्यानंतर मानवी रांगोळीच्या निमित्ताने राबविलेल्या मी मतदान करणार या सह्यांच्या मोहिम उपक्रमास भेट देवून सह्या केल्या. शेवटी उपस्थितांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
मानवी रांगोळी साकारण्यासाठी या उपक्रमामध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम.एल.जी. हायस्कूल, प्रि.इंदूमती देवी हायस्कूल, मनपा पी.बी. साळुंखे विद्या., एस.एम.लोहीया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इं. मि. स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, मनपा नेहरुनगर विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्या., कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, मनपा राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलसह शहरातील सर्व शाळा व हायस्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले.