दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत एकूण 242191 मुर्ती संकलन तर सुमारे 500 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत ü 2908 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. राहूल पाटील यांनी केले होते. उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेणेसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सभापती यांना आवाहनपत्र देणेत आलेली होती.
या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपक्रम यशस्वी करणेसाठी तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविणेसाठी व ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करणेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना समन्वयासाठी ग्राम पंचायती देण्यात आलेल्या होत्या. उपक्रम यशस्वी करणेसाठी मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत सडोली खा., ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायतस्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. तसेच ग्राम पंचायत टोप, ता. हातकणंगले येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सर्व सन्माननिय सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य तसेच लोकप्रतिनीधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.