राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

कुष्ठरोग हा मायको बॅक्टेरिअम लेप्री या जंतुमुळे होणारा अत्यल्प सांसर्गिक आजार आहे.

कुष्ठरोगाची संशयित लक्षणे :-

न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा/चट्टे
हातापायातील मज्जातंतू जाड व दुखर्‍या होणे.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकिय व निमशासकिय दवाखान्यात कुष्ठरोगावरील निदान व उपचाराची विनामुल्य सोय उपलब्ध आहे.
कुष्ठरोगावरील बहुविध औषधोपचार नियमित घेतल्याने ( ६ महिने किंवा एक वर्ष) कुष्ठरोग पुर्णपणे बरा
होतो.

कुष्‍ठरोगाचा इतिहास

कुष्‍ठरोग ही एक अनादि काळापासून चालत आलेली मानवी समस्‍या असून या रोगाचे रोगजंतू मानवी मज्‍जातंतूमध्‍ये वाढत असल्‍याने रुग्‍णांस येणारी विद्रुपता व व्‍यंगत्‍वामुळे कुष्‍ठरोग एक लांच्छन असल्‍याचा समाजातील कित्‍येकांचा समज होता व अजूनही आहे. बहुवि‍धऔषधोपचार या आश्‍चर्यजनक शोधामुळे कुष्‍ठरुग्‍णाची काही लाखामध्‍ये असलेली संख्‍या आता हजारात आली आहे. तो दिवस दूर नाही ज्‍याप्रमाणे देवीरोगा सारखा कुष्‍ठरोग हा सुध्‍दा इतिहासजमा होईल. परंतु हे समाजातील लोकांनी स्‍वतःहुन तपासणीसाठी पुढे येऊन जर कुष्‍ठरोग असेल तर त्‍वरीत औषोधोपचार चालु केल्यास साध्य होईल.

इतिहासामध्‍ये कुष्‍ठरोग हा कित्येक शतकापासून चालत आलेला एक जुना रोग आहे. भारतामध्‍ये इ.स.ख्रिस्‍तपुर्व १४०० पुर्वी वैदिक साहित्‍यामध्‍ये “कुष्‍ठ” या नावाने या रोगाचा उल्‍लेख आढळतो. मनस्मृतीमध्ये कुष्‍ठरोगापासुन बचाव कसा करायचा या विषयी सूचना दिलेल्‍या आढळतात. सुश्रुतसंहिता या ग्रंथामध्‍ये कुष्‍ठरोगाबाबत चांगली माहिती व त्‍यावरील उपचार दिलेले आढळतात. इ.सन. ख्रिस्‍तपुर्व ६०० मध्‍ये शस्त्रक्रियेवरील भारतीय शास्त्रज्ञाने लिहीलेले सुश्रुत नावाचे पुस्‍तक आढळते. या पुस्‍तकामध्‍ये कुष्‍ठरोग हा संसर्गजन्‍य रोग असुन कुष्‍ठरोग बाधित व्‍यक्‍तीपासुन निरोगी व्‍य‍क्‍तीला हा रोग होतो, असा उल्‍लेख आहे. यावरुन इ.सन. पुर्व १४०० पासुन कुष्‍ठरोग हा सर्वसामान्‍य रोग आहे, असे अनुमान वरिल पुराव्यावरुन दिसून येते. “झरत” या हिब्रु भाषेतील शब्‍दाचे भाषांतर लेप्रसी असे आहे. व त्‍यांचा उल्‍लेख बायबलमध्‍ये केलेला आहे. याचा अर्थ फक्‍त कुष्‍ठरोग नसुन सर्वप्रकारचे इतर त्‍वचारोग असा आहे. लेव्‍हीक्‍टीस या ग्रंथामध्‍ये पाद्री लोकांना कुष्‍ठरोगी व्‍यक्तिपासुन रोगाचा प्रसार होवु नये म्‍हणुन कोणकोणते प्रतिबंधक उपाय योजावेत या विषयी स्‍पष्ट सूचना दिलेल्‍या आहेत. इ.सन. पुर्व 600 मध्‍ये चिनी साहित्‍यामध्‍ये कुष्‍ठरोगाचा उल्‍लेख आढळतो. परंतु त्‍या पुर्वी कुष्‍ठरोग होता अथवा नाही याचा निश्चित पुरावा येथे आढळत नाही. इ.सन. १५० मध्‍ये सदर आजाराचे वर्णन युरोपमध्‍ये गॅलेन यांच्‍या समकालीन अॅरक्‍टस यांनी केलेले आढळते. इ.सन पुर्व ४५० मध्‍ये हिपोक्रटस यांनी कुष्‍ठरोगाचा उल्‍लेख केल्‍याचे आढळून येत नाही. ग्रीक – रोमन युद्धानंतर कुष्‍ठरोगाचा प्रादुर्भाव सैनिकामध्‍ये झाला. इ. सन. ५०० ते ७०० मध्‍ये प्रो. मौलर ख्रिश्‍चन यांनी मानवी कवटयाचा अभ्‍यास करुन ग्रेट ब्रिटन, फ्रान्‍स, इजिप्‍तमध्‍ये कुष्‍ठरोग आढळुन आल्‍याचे सिध्‍द केले आहे. इ. सन. १००० ते १४०० मध्‍ये कुष्‍ठरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला होता. इ. सन. १९६९ मध्‍ये अॅडरसन यांनी युरोपमधील कुष्‍ठरोगाचा प्रसार आणि चढउतार यासंदर्भातील उपलब्‍ध माहितीच्‍या आधारे प्रबंध सादर केला. कुष्‍ठरोग हा अत्‍यंत संसर्गजन्‍य रोग असल्‍याचे प्रबंधात नमूद केले आहे आणि यामुळेच त्‍या काळात सदर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अमानवी उपाय राबविण्‍यात आले.

१८ व्‍या शतकामध्‍ये आणि १९ व्‍या शतकाच्‍या सुरवातीस म्‍हणजेच हॅनसन यांनी लेप्रसी जंतूचा शोध लावण्‍यापुर्वी युरोपमध्‍ये कुष्‍ठरोग अनुवंशिक असल्‍याचे मानले जात असे. साथरोग शास्त्राच्या आधारे नार्वे शास्त्रज्ञाच्या मते अनुवंशिक प्रतिपादन मागे पडून संसर्गजन्‍य रोग असल्‍याचे सिध्‍द झाले. नावरु ,केपबे्टोन, लुसियाना आणि इतर काही ठिकाणी झालेल्‍या उद्रेकाने कुष्‍ठरोग झाल्‍याचे ठोस पुरावे आढळुन आले. त्‍या काळात रुग्‍णांना एकाच ठिकाणी स्थानबद्ध करित असत. त्‍यानंतरच्‍या काळात कुष्‍ठरोगाचे प्रमाण कमी होत गेले आणि १९ व्‍या शतकात युरोपमध्ये त्‍याचे निर्मुलन झाले.त्‍याची कारणे खालील प्रमाणे

1.      रुग्‍णाचे विलगीकरण

2.      सामाजिक व आर्थिक सुधारणा, सुधारित निवास व्‍यवस्‍था, दरडोई उत्‍पन्‍नात वाढ, सकस आहार, उत्‍तम सांडपाणी व्‍यवस्‍था

यामुळे रोगप्रसारास कारणीभुत ठरणा-या बाबी नाहिशा होण्‍यास मदत झाली.

कुष्‍ठरोगाचा उगम आणि प्रसार या बाबतची माहिती आफ्रिकेमध्‍ये अत्‍यंत अपूरी आढळून येते. परंतु नायजेरिया, युगांडा, झायरी या देशामध्‍ये कुष्‍ठरोगाचे प्रमाण अधिक असल्‍याचे आढळुन येते. सुरवातीस अमेरिकेमध्ये पहिल्‍या कोलंबसच्‍या सैनिकांच्‍यामूळे कुष्‍ठरोगाचा प्रवेश झाला आणि नंतर अतिरुग्‍णभार असलेल्‍या पश्चिम आफ्रिकेतील गुलामांच्‍या पद्धतीमुळे झाला. युरोप आणि चीन मधील ये जा करणा-या प्रवाशांमुळे इतर खंडात रोगाचा प्रादुर्भाव झाला. कुष्‍ठरोगास कारणीभुत असणा-या जंतू मायक्रोबॅक्टे्रियम असुन त्‍यांचा शोध नार्वे येथील शास्त्रज्ञ डॉ हॅनसन (१८४१-१९१२) यांनी १८७३ मध्‍ये लावला. त्‍यामुळेच या जंतुस सर्वसधारणपणे हॅनसन जंतू असे ओळखले जाते.

कुष्‍ठरोगाचे दिपस्‍तंभ

डॉ हॅन्‍सनः १८४१-१९१२) ः- या नार्वेजियन शास्त्रज्ञ २८ फ्रेब्रुवारी १८७३ रोजी सुक्ष्मदर्शकयंत्राखाली मायक्रोबॅक्‍टेरियम लेप्री या कुष्‍ठरोगाच्‍या जंतूचा शोध लावला. त्‍यांचा जन्‍म २९ जुलै १८४१ साली बगर्न या शहरात झाला. आणि १८६६ मध्‍ये त्यांनी मेडिसन या विषयात पदवी घेवुन सेस्‍ट जॉर्गन हॉस्पिटलमध्‍ये कुष्‍ठरोगजंतुबाबत संशोधन करण्‍यात व कुष्‍ठरोग्‍याची सेवा करण्‍यात आपले जीवन व्‍य‍तीत केले.

डेमियन ः- फादर डेमियन यांचा जन्‍म ३ जानेवरी १८४० मध्‍ये बेल्‍जीयम मध्‍ये झाला व १८६९ मध्‍ये पोप म्‍हणून नियुक्‍ती झाली. हवाली या बेटावरील कुष्‍ठरुग्‍णांची सेवा करित कुष्‍ठरुग्‍णाच्‍या व्‍यथांकडे शासनाचे व संपूर्ण जगाचे लक्ष्‍ा वेधुन घेतले. १५ एप्रील १८८९ या दिवशी त्‍यांचा मृत्‍यु झाला. तोपर्यत त्‍यांनी त्‍यांचे जीवन कुष्ठरुग्ण सेवेतच व्‍यतीत केले.

डॉ क्‍लेर वेलट ः यांचा जन्‍म २९ आक्‍टोबर १९२६ मध्‍ये झाला. त्‍यांनी लोव्‍हेट युनिव्हार्सिटी १९५२ मध्‍ये एम. डी. पॅथॉलोजी केले, आणि १९५४ मध्‍ये भारतात आले. दिल्‍ली येथील क्लिनीक मध्‍ये त्‍यांनी लेप्रसी बाबत कार्य सुरु केले. डॉ फ्रान्‍स हेमरजिक्‍स यांचे समवेत १९५५ मध्‍ये दक्षिणभारतातील पोलाम्‍बक्‍कम येथे कु्ष्‍ठरोग नियंत्रण्‍ पथक तयार केले. १९६० ते १९८० या काळात मुख्‍य वैदयकिय अधिकारी म्‍हणून काम केले. डेमियन फॉडेशन ट्रस्‍ट च्‍या सचिव पदावर काम पाहिले. तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश, राज्‍यस्‍थान, ओरिसा, गुजरात, आणि कर्नाट‍कमध्‍ये त्‍यांनी कुष्ठरुग्णांवर औषधोपचार सुरु केले. १९८० मध्‍ये भारत सरकारने त्‍यांना पद्मश्री देवुन गौरविले.

बाबा आमटे ः-वरोर येथील श्रीमंत जमीनदार कुटुंबामध्‍ये १९१४ मध्‍ये जन्‍म झाला. एकदा त्‍यांनी अत्‍यंत वाईट परिस्‍थीतीमधील व्‍यंग असलेला कुष्‍ठरुग्‍ण पाहिला आणि त्‍यांचे जीवनच बदलुन गेले. त्‍यांनी त्‍यांची पत्‍नी साधनासह संपुर्ण जीवन कुष्‍ठरुग्‍णांच्‍या सेवेतच घालविण्‍याचे ठरविले. शासनाकडुन त्‍यांनी ५० एकर वैराण जमीन घेतली .जून १९५१ मध्‍ये वरोरा येथे बाबांनी महारोगी सेवा समिती स्‍थापून आनंदवन निर्माण केले. बाबांना डेमियन पुरस्‍कार मिळाला. मेगॅसेसे आणि पदमविभुषण या पुरस्‍काराचेही ते मानकरी ठरले.

रोगजंतू /जिवाणू

  •        मायक्रोबॅक्टरियम लेप्री
  •     सावकाश वाढ- १२ ते १४ दिवस
  •        जिवाणूची कृत्रिम वाढ शक्य नाही
  •       स्त्रोत – मानव
  •        प्रसाराचे माध्यम – श्वसनसंस्था/नाक
  •       प्रसाराचा मार्ग – तुषारांद्वारे
  •      दीर्घ अधीशयन कालावधी – ५ – ७ वर्षं

जंतुसंसर्ग होणारी व्यक्ति

  •         ९५ % लोकसंख्ये मध्ये रोगाप्रती नैसर्गिक प्रतिकार शक्ती
  •      रोगाचा संसर्ग कोणत्याही वयात होतो
  •        लिंगनिहाय प्रमाण – पुरुषांमध्ये प्रमाण जास्त
  •        मृत्यूचे प्रमाण – कुष्ठरोगामुळे मृत्यू होत नाही

सामाजिक व वातावरणातील घटक

  •      सामाजिक आर्थिक घटक – गरीबी,गर्दी,स्वच्छतेचा अभाव,कोंदटपणा,
  •       स्थलांतरामुळे दूरिकरणावर परिणाम व प्रसाराचे प्रमुख कारण
  •        घृणा व बहिष्कृत होणेची भीती

प्रतिबंधात्मक उपाय

  •       लागण झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराच्या मदतीने संसर्ग खंडित करणे हा एकमेव प्रभावी उपाय , त्यामुळे जंतू संसर्ग प्रमाण कमी होते
  •       सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता
  •       निदान तपासणी आणि चाचणी

तपासणीकरिता आवश्यक घटक

  •       रुग्ण व त्यांचे कुटुंबीयांना धीर व समुपदेशन
  •       पुरेसा सूर्यप्रकाश
  •       रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी
  •       महिला रुग्णाची महिला वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी अथवा अन्य महिलेच्या उपस्थितीत तपासणी

शारिरीक तपासणी

  •      रुग्ण कार्ड वर चटयाचे ठिकाण नोंदविणे
  •         एक किवा काही चट्ट्यांची बधिरपणा साठी तपासणी करणे
  •       त्वचेलगतच्या मज्जातंतू जाड व दुखर्‍या असल्याबाबतची तपासणी
  •        डोळे ,हात आणि पाय यांची तपासणी

उद्देश व उद्दीष्ट·

राज्‍यातील सर्व जिल्‍हयात कुष्‍ठरोगाचे निर्मुलनाचे ध्‍येय साध्‍य करणे.

  •       विकृति प्रतिबंध आणि पुनर्रचनात्‍मक शस्त्रक्रियाद्वारे विकृति दर्जा २ चे प्रमाण कमी करणे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा आराखडा तयार करताना राष्ट्रीय ग्रामिण आरोग्‍य योजनेच्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार बाराव्‍या पंचवार्षिक योजनेमध्‍ये प्रस्‍तावित केलेला आराखडा आधारभूत मानावा. बाराव्‍या पंचवार्षिक योजनेमध्‍ये प्रस्‍तावित केलेली खालील ८ ध्‍येये मार्च २०१७ अखेर साध्‍य करावयाची आहेत.

  •     नविन कुष्‍ठरुग्‍णांना लवकरात लवकर शोधण्‍याच्‍या कार्य पध्‍दतीत सुधारणा करणे.
  •        कुष्‍ठरुग्‍णांना मिळणा़-या सेवांच्‍या व्‍यवस्थापनामध्‍ये सुधारणा करणे.
  •       कुष्‍ठरोगाविषयी गैरसमज अथवा भिती कमी करणे.
  •     कुष्‍ठरोग निदान करण्‍यात निष्‍णात असलेले कर्मचारी तयार करण्‍याच्‍या दृष्टीने योजना विकसीत करणे.
  •      संशोधनाच्‍या निकषावर आधारीत कार्यक्रम अमलात आणणे.
  •      संनियंत्रण पर्यवेक्षण आणि मुल्‍यमापन पध्‍दतीमध्‍ये सुधारणा करणे.
  •        समाजामध्‍ये कुष्‍ठरुग्‍णांचा सहभाग वाढविणे.
  •       कार्यक्रमाच्‍या व्‍यवस्‍थापनाची वेळोवेळी खात्री करणे.

केंद्रशासनाने ठरवून दिलेली बाराव्‍या पंचवार्षिक योजनेअखेर साध्‍य करावयाची अपेक्षीत उध्‍दीष्‍टे.

·         सर्व जिल्‍हयांमध्‍ये कुष्‍ठरुग्‍णांचे प्रमाण दर दहा हजारी १ पेक्षा खाली आणणे १०० टक्‍के

·         सर्व जिल्‍हयांमध्‍ये नविन शोधलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांचे प्रमाण दर दहा हजारी १०० टक्‍के

१ पेक्षा खाली आणणे

  •         सांसार्गिक कुष्‍ठरुग्‍णांचे उपचार पूर्ण करणे ९५ टक्‍के
  •       असांसार्गिक कुष्‍ठरुग्‍णाचे उपचार पूर्ण करणे ९७ टक्‍के
  •     नविन शोधलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांमध्‍ये विकृती दर्जा-२ १.८५ टक्क्यांच्या ३५ टक्‍के ने चे प्रमाण खाली आणणे. खाली आणणे म्हणजे १.२० टक्‍के

(आधारभूत वर्ष २०११-१२ – १.८५ टक्‍के)

भविष्‍यातील धोरणे

  •         नविन कुष्‍ठरुग्‍णांना लवकरात लवकर शोधून त्‍वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्‍यासाठी प्रवृत्त करणे.
  •        यापुढे कुष्‍ठरुग्‍णभार कमी करुन कुष्‍ठरुग्‍ण व त्‍यांच्‍या कुटुंबाप्रती समाजात असलेली घृणा भेदभाव कमी करणे.
  •       बळकट संदर्भ सेवा यंत्रणा आणि विकृती प्रतिबंध व वैदयकिय पुनर्वसन सेवा वृध्‍दींगत करुन सर्वसाधारण आरोग्‍य सेवेमार्फत गुणवत्‍तापूर्ण कुष्‍ठरोग सेवा पुरविण्‍यावर भर देण्‍यात यावा.
  •        सर्वसाधारण आरोग्‍य सेवेतील कर्मचा़-यांची कार्यक्षमता वेळोवेळी प्रशीक्षणाद्वारे वाढविणे.
  •      माहिती शिक्षण व जनसंपर्कादवारे आणि योग्‍य सल्‍ला दिल्‍यास स्वेच्‍छा तपासणीसाठी रुग्‍ण स्‍वत:हून पुढे येतील.
  •    संनियंत्रण आणि पर्यवेक्षण यांचे बळकटीकरण

अंमलबजावणी पध्‍दती

  •        राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्‍य सेवेमध्‍ये एकत्रिकरण झाले आहे. आता नविन कुष्‍ठरुग्‍ण सर्वसाधारण आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत शोधले जातात. आरोग्‍य कर्मचारी संशयित कुष्‍ठरुग्‍ण शोधून प्रा. आ. केंद्राच्‍या वैदयकिय अधिका-यांकडे निदाननिश्चिती करीता पाठवितात. वैदयकिय अधिका-यांनी निदान निश्चिती ७ दिवसांच्‍या आत करणे अपेक्षीत आहे. तसेच नविन कुष्‍ठरुग्‍णांना अप्रत्‍यक्ष सर्वेक्षणाद्वारे वैदयकिय अधिकारी बाहयरुग्‍ण तपासणीमध्‍ये शोधतात. केंद्रशासनाने सर्वेक्षणाद्वारे नविन कुष्‍ठरुग्‍ण शोधण्‍यावर जानेवारी २००५ पासून बंदी आणलेली आहे. स्‍वेच्‍छा तपासणीसाठी संशयित कुष्‍ठरुग्‍ण स्‍वतःहून लवकरात लवकर पुढे यावेत म्‍हणून माहिती आरोग्‍य शिक्षण व संवादाद्वारे प्रसिध्‍दी कार्यक्रम क्षेत्रिय स्‍तरावर राबविला जातो. कुष्‍ठरोगाची निदान निश्चिती झाल्‍यावर कुष्‍ठरुग्‍णांना त्‍वरीत बहुविध औषधोपचाराखाली रोगप्रकारानुसार आणले जाते, (असांसर्गिक ६ महिने व सांसर्गिक १२ महिने) औषधोपचार सुरु झाल्‍यावर रोगाचा प्रसार थांबविण्यास मदत होते. बहुविध औषधोपचाराची १ ली पर्यवेक्षकिय मात्रा रुग्‍णास मिळाल्‍यावर त्‍याच्‍या शरीरातील ९९.९९ टक्‍के कुष्‍ठजंतू मारण्‍यास मदत होते. कुष्‍ठरोगाचे जंतू निरोगी माणसाच्‍या शरीरात ६ महिने ते ३० वर्षापर्यंत, सरासरी २ ते ५ वर्षापर्यंत सुप्‍तावस्‍थेत राहतात.
  •         प्रशिक्षण – वैदयकिय अधिका-यांचे व बहुउध्‍देशिय कर्मचारी/ आरोग्‍य सहाय्यक यांचे १ दिवसीय उजळणी प्रशिक्षण सत्रे जिल्‍हास्‍तरावर घेण्‍यात येणार आहेत. डिस्‍ट्रीक न्यूक्‍लीयस टिमचे २ सञे आयलेप पार्टनर यांचे सहाय्याने प्रशिक्षण घेण्‍यात येणार आहेत.
  •     जिल्‍हास्‍तरावर रॅली, प्रश्‍नमंजूषा कार्यक्रम, आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या, खाजगी वैदयकिय व्‍यावसायिकांच्‍या, महिला मंडळ व स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या कार्यशाळा आणि बाजार व जत्रा या ठिकाणी हस्ततपत्रिका वाटप व माईकवरुन माहिती देणे या कृती राबविणेत येणार आहेत.
  •         कुष्ठ रोगाचे साठीच्या योजनांचा समावेश करणे
  •      1 बस पास
  •     2 घरकुल योजना
  •        3 पाल्याना मोफत ‍ प्रशिक्षण्‍
  •          4 गॉगल चप्पल सॅडल
  •         5 मॉलीश्‍ करीता तेल वगैरे
  •        विकृती प्रतिबंध आणि वैदयकिय पुनर्वसन –
  •     शस्‍ञक्रियेसाठी पात्र असलेल्‍या विकृती कुष्‍ठरुग्‍णांवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय व ठराविक स्‍वयंसेवी संस्‍थांमध्‍ये पुर्नरचनात्‍मक शस्त्रक्रिया मोफत केल्‍या जातात.
  •     दारिद्रयरेषेखालील व मेजर शस्त्रक्रिया झालेल्‍या लाभार्थिंना रु.८०००/- देण्‍यात येतात.
  •    मेजर शस्त्रक्रिया करणा-या संस्‍थांना रु.५०००/- प्रोत्‍साहनपर देण्‍यात येतात.
  •     पायाला बधीरता असलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांसाठी पायाला नवीन जखमा होवू नयेत किंवा असलेल्‍या जखमा वाढू नयेत म्‍हणून रुग्‍णाला वर्षातून दोनदा एम.सी.आर.चप्‍पल मोफत पुरविण्‍यात येतात.
  •    डोळयांच्‍या पापण्‍या बंद होण्‍याची समस्‍या (लॅगॉफथॅलमस) असलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांना किंवा डोळयातून सतत पाणी येत असल्‍यास डोळयाच्‍या संरक्षणासाठी गॉगल्‍स पुरविले जातात.
  •     कुष्‍ठरुग्‍णांची हाताची बोटे वाकडी असतील तर विकृतीत वाढ होऊ नये म्‍हणून स्प्लिंटस मोफत पुरविले जातात.
  •     पात्र कुष्‍ठरुग्‍णांना सर्व शासकिय रुग्‍णालये, प्रा.आ.केंद्रे, नगरपालिका/महानगरपालिका दवाखान्‍यात व स्‍वयंभू कुष्‍ठवसाहतीमध्‍ये गरजेप्रमाणे व्रणोपचार सेवा मोफत देण्‍यात येतात.

पात्र कुष्‍ठरुग्‍णांना विकृती असल्‍यास किंवा विकृती टाळण्‍यासाठी सर्व शासकिय रुग्‍णालयात तसेच स्‍वयंभू कुष्‍ठवसाहतीमध्‍ये भौतिकोपचाराच्‍या मोफत सेवा दिल्या जातात.

विशेष कुष्‍ठरोग शोध मोहीम – (दि. ३ ते १२ ऑक्‍टोबर २०१२)उद्देश व उद्दीष्ट

  •      सदर उपक्रम महाराष्‍ट्र राज्‍यातील ज्‍या तालुक्‍यामध्‍ये वार्षिक नवीन शोधलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांचा माहे मार्च २०१२ अखेर दर १ लाख लोकसंख्‍येमध्‍ये १० पेक्षा जास्‍त आहे अशा २२५ तालुक्‍यांमध्‍ये राबविण्‍यात आला.
  •        सदर उपक्रमाद्वारे सर्वसामान्‍य जनतेमध्‍ये जनजागृती करण्‍यात आली.
  •       मोहीमेत सहभागी असलेल्‍या वैदयकिय अधिकारी, आरोग्‍य सहाय्यक, आरोग्‍य कर्मचारी (पुरुष व स्‍ञी) आशा वर्कर यांचे १ दिवसाचे प्रशिक्षण घेण्‍यात आले.
  •       समाजातील दडून राहिलेले जास्‍तीत जास्‍त कुष्‍ठरुग्‍ण शोधून काढून त्‍यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्‍यात आले.

मोहीमेची पध्‍दत 

  •       मोहीमेपूर्वी एक महिना आधी व मोहिम कालावधीत आरोग्‍य शिक्षण.
  •     मोहीमेसाठी पथकांची स्‍थापना व प्रशिक्षण.
  •       मोहिम कालावधीत भेट दिलेल्‍या व्‍यक्तिंना आरोग्‍य शिक्षण देण्‍यात आले. तसेच संशयित कुष्‍ठरुग्‍ण शोधून त्‍यांची कुष्‍ठरोगाबाबत निदाननिश्‍चीती, मोहिम कालावधीतील निदान निश्‍चीत झालेल्‍या नविन कुष्‍ठरुग्‍णांना त्‍वरीत बहुविध औषधोपचाराखाली रोगप्रकारानुसार आणण्‍यात आले.

देण्‍यात येणा-या सेवा·

सर्व आरोग्‍यसंस्‍थांमध्‍ये मोफत रोगनिदान बहुविध औषधोपचार

  •       अगोदरच्‍या विकृतीमध्‍ये वाढ होऊ नये किंवा नवीन विकृती येऊ नयेत यासाठी विकृती प्रतिबंध व वैदयकिय पुनर्वसन सेवा दिल्‍या जातात.
  •       शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्‍या विकृती कुष्‍ठरुग्‍णांवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय व ठराविक स्‍वयंसेवी संस्‍थांमध्‍ये पुर्नरचनात्‍मक शस्त्रक्रिया मोफत केल्‍या जातात. दारिद्रयरेषेखालील व मेजर शस्त्रक्रिया झालेल्‍या लाभार्थिंना रु.८०००/-        एम.सी.आर.चप्‍पल- पायाला बधीरता असलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांसाठी पायाला नवीन जखमा होवू नयेत किंवा असलेल्‍या जखमा वाढू नयेत म्‍हणून रुग्‍णाला वर्षातून दोनदा एम.सी.आर.चप्‍पल मोफत पुरविण्‍यात येतात.
  •          गॉगल्‍स- डोळयांच्‍या पापण्‍या बंद होण्‍याची समस्‍या (लॅगॉफथॅलमस) असलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णांना किंवा डोळयातून सतत पाणी येत असल्‍यास डोळयाच्‍या संरक्षणासाठी गॉगल्‍स पुरविले जातात.
  •          स्प्लिंटस- कुष्‍ठरुग्‍णांची हाताची बोटे वाकडी असतील तर विकृतीत वाढ होऊ नये म्‍हणून स्प्लिंटस मोफत पुरविले जातात.
  •         व्रणोपचार- पात्र कुष्‍ठरुग्‍णांना सर्व शासकिय रुग्‍णालये, प्रा.आ.केंद्रे, नगरपालिका/महानगरपालिका दवाखान्‍यात व स्वयंभू कुष्‍ठवसाहतीमध्‍ये गरजेप्रमाणे व्रणोपचार सेवा मोफत देण्‍यात येतात.
  •         भौतिकोपचारा – पात्र कुष्‍ठरुग्‍णांना विकृती असल्‍यास किंवा विकृती टाळण्‍यासाठी सर्व शासकिय रुग्‍णालयात तसेच स्‍वयंभू कुष्‍ठवसाहतीमध्‍ये भौतिकोपचाराच्‍या मोफत सेवा दिल्‍या जातात.