शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

   शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली

शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

 

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA) दिल्ली, तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली शालेय गुणवत्ता सुधारणेसाठी शाळासिध्दी तथा शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण केला आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने दि. 30 मार्च 2016 रोजी शाळासिध्दी शासन निर्णय केला, ज्यायोगे राज्यातील सर्व शाळांनी शाळासिध्दी कार्यक्रम राबविणे अनिवार्य केले गेले. याचपाठोपाठ दि. 16 सप्टेंबर 2016 व 7 जानेवारी 2017 रोजी शाळासिध्दी साठी पूरक शासन निर्णय केले.प्रत्येक शाळेने त्यांच्या स्व-सुधारणेसाठी उपाय योजणे व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहेत.शासन निर्णयानुसार न्यूपा (NUEPA) दिल्ली यांनी ‘¿ÖÖôûÖ×ÃÖ¬¤üß’ नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ (www.shalasiddhi.org) निर्माण केले होते. या संकेतस्थळावर देशातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. दि. 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

न्यूपाने दिलेल्या लिंकवर प्रत्येक शाळेने स्वत:चा युडायस कोड वापरून पासवर्ड क्रिएट करून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर शाळासिध्दीच्या 7 मानकांनुसार 45 उपक्षेत्रात स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यमापन 999 गुणांपैकी करावयाचे बंधनकारक केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाच्या 7 मानकांनुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीचे भरीव नियोजन तथा ॲक्शन प्लॅन तयार केला. याचा पहिला टप्पा म्हणजे जुलै 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यनिर्धारक यांच्या सहकार्याने शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर डाएट येथे प्रत्येक तालुक्यातून कृतीशील शिक्षकांची टीम तयार केली व या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शाळासिध्दीची 7 मानके व त्यानुसार उपक्रम व कार्यक्रम कसे विकसित करायचे यावर चर्चा केली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापकांनी क्षेत्रनिहाय कोणते अभिलेख ठेवायचे, तसेच पुरावे ठेवावयाचे याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केले गेले.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3683 पैकी 610 शाळा श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध शाळांपैकी श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील 1012 शाळा या ‘ब’ श्रेणीत आहेत. उर्वरीत 919 ‘क’ श्रेणी व 628 ‘ड’ श्रेणीत आहेत.या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद, पुणे यांचेकडून ‘अ’ श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन होणार असून त्यासाठी 2000 पेक्षा अधिक निर्धारक राज्यभरातून प्रशिक्षित केले आहेत. शाळा बदलून हे निर्धारक बाह्यमूल्यमापन करणार आहेत. ही प्रक्रिया दि. 10 एप्रिल नंतर करण्याचे नियोजित असून सदरचे आदेश त्याच दिवशी प्राप्त होतील.स्वयंमूल्यमापनात ज्या शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत त्यांचेच बाह्यमूल्यमापन होईल. अशा प्रत्येक शाळेला निर्धारक भेट देऊन 2 दिवस पुरावे, अभिलेखे यांची पडताळणी करून तद्संबंधीचे गुणदान विद्या परिषदेकडे गोपनीय स्वरूपात संकेतस्थळावर देतील. यानंतर पात्र शाळांना SS2016 असे प्रमाणपत्र शासनाकडून दिले जाईल, ज्याची वैधता 5 वर्षे असेल. 5 वर्षांनंतर बदलता शिक्षणप्रवाह व गरजानुरूप 7 मानकांत बदल केले जातील व त्यावेळी पुन्हा असे मूल्यमापन करणे बंधनकारक राहील.एकंदरीत शाळासिध्दी या राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहील व शाहूंचा शिक्षण वारसा जोपासला जात आहे असेच चित्र दिसते. यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुणाल खेमनार व शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले असून सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.