राजर्षि छत्रपति शाहू पुरस्कार वितरण समारंभ- दि.16 जुलै 2017

कोल्हापूर जिल्हा आणि छ.शाहू महाराज यांचे नाते अत्यंत दृढ आहे.  छ.शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकीर्दीत जे अलौकिक कार्य केले, ते सर्वांनाच सतत प्रेरणा देत राहिले आहे.  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.  या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी सर्वच जण आपापल्या परीने कार्यरत असतात.  त्यांच्या प्रयत्नांना दाद म्हणून त्यांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना छ.शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2000 पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमधून 5 व अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून 15 जणांची निवड त्यासाठी करण्यात येते.  पुरस्कारांसाठी निवड करतांना, सन्माननीय सदस्य यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कार्याचा विचार केला जातो.  कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वर्षांची सेवा, गोपनीय अभिलेख, त्यांचे जनता, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांशी असलेले साहचर्याचे नाते, याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वा कलाक्षेत्रातही उल्लेखनीय योगदान असेल तर त्याचाही विचार करण्यात येतो.  अशा रीतीने पारख करून पुरस्कारांसाठी योग्य अशा सदस्य व कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा प्रयत्न होतो.

सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ  असे पुरस्काराचे स्वरूप असून, चालू वर्षीही 5 सन्माननीय सदस्य व 15 कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामानिमित्त, मा.ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  सदस्य व कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.