जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची नियमित शाळेत १०० % पटनोंदणी होणेकरिता तसेच एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या प्रथम दिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेबाबत सूचना देणेत आलेल्या होत्या. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होणेसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळाभेटींचे नियोजन करणेत आलेले होते. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी सक्रिय सहभागी होणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करणेत आले होते.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्साही वातावरणामध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. कोणतेही काम यशस्वी व्हावयाचे असेल तर त्याची सुरुवात चांगली असायला लागते. जिल्हा परिषद शाळांमधील आजचा प्रवेशाचा कार्यक्रम पाहता या शाळा नक्कीच गगनभरारी घेतील अशी आशा वाटते. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त शाळेत हजेरी लावून इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत केले. यामध्ये मा.आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजीवन वि.मं. चंदूर ता.हातकणंगले, मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी वि.मं.मिणचे ता.हातकणंगले, मा.आमदार श्री.उल्हास पाटील यांनी कन्या वि.मं. दत्तनगर ता.शिरोळ, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी कुमार व कन्या वि.मं. गडमुडशिंगी ता.करवीर, मा.उपाध्यक्ष श्री.सर्जेराव पाटील यांनी कुमार वि.मं. कळे ता.पन्हाळा, मा.शिक्षण सभापती श्री.अंबरिष घाटगे यांनी वि.मं. गलगले ता.कागल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख यांनी कन्या वि.मं.वाकरे ता.करवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे यांनी वि.मं.कोथळी ता.करवीर, मा.शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी कुमार व कन्या वि.मं.कुंभोज ता.हातकणंगले यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी यांनी विविध शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन व शिक्षकांना प्रेरणा दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करणेत आले. तसेच शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देणेत आला. अशा रितीने जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.

                                                                                      शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                      जिल्हापरिषदकोल्हापूर