आर टी ई अंतर्गत २५ टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणेची तरतूद आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. सदर प्रक्रियेअंतर्गत 347 शाळांमधील 3501 जागांसाठी एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ज्या शाळांना 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा 70 शाळांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेचे आयोजन मंगळवार दि. 13/03/2018 इ. रोजी दुपारी 1.00 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करणेत आलेले होते. सदर लॉटरी प्रक्रियेला जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले, म.न.पा. प्रशासन अधिकारी                  श्री. विश्वास सुतार, विस्तार अधिकारी श्री. जे. टी. पाटील, श्रीम. जे. एस. जाधव, RTE पोर्टल ऑपरेटर श्री. एस. एम. खंडेपारकर, श्री. नचिकेत सरनाईक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या शाळांचे प्रतिनिधी व पालकवर्ग उपस्थित होता.

सर्वप्रथम शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेबाबत सर्व उपस्थितांना सविस्तर माहिती दिली व पालकांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर उपस्थित पालकांमधून 3 लहान मुलींना स्टेजवर बोलावून त्यांचे हस्ते 3 स्वतंत्र बरण्यांमधील 0 ते 9 क्रमांकापर्यंतच्या चिठ्ठया काढणेत आल्या. सदर चिठ्ठयांचे क्रमांक शासनाच्या RTE पोर्टलवरील विहीत रकान्यात नोंदवून पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने लॉटरी प्रक्रिया पार पाडणेत आली. ही प्रक्रिया ऑनलाईन असलेने                        दि. 14/03/2018 इ. रोजी NIC सेंटरमधून लॉटरी लागलेल्या तसेच लॉटरी न लागलेल्या अशा सर्वच पालकांना मेसेज जातील. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून  न राहता RTE वेबसाईटवरील SELECTED व NOT SELECTED या ठिकाणी जाऊन आपला फॉर्म नंबर लिहून खात्री करावी. ज्यांचे नाव NOT SELECTED मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल.ज्यांना लॉटरी लागल्याचा मेसेज येईल त्यांनी वेबसाईटवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून पुन्हा ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करावे आणि ज्या शाळा मिळाल्या असतील त्या शाळांच्या नावाची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित शाळेत जावे व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पहिल्या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी दि. 14/03/2018 ते दि. 24/03/2018 असा आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन         श्री. सुभाष रा. चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर